"आर्टिफिशियल इंटेलिजन्स" पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हाच प्रेरणा होती जेफ्री हिंटन यांची. खरं सांगायचं तर त्यांच्याबद्दल दहा वर्षांपूर्वी मला देखील माहिती नव्हती. प्रत्यक्षात न्यूरल नेटवर्क शिकवायला घेतलं त्यानंतर या मागचा कर्ताधर्ता कोण? या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं. ते होते जेफ्री हिंटन.
आज अस्तित्वात असणाऱ्या बहुतांश उत्पादनांमागचं तर्कशास्त्र न्यूरल नेटवर्कमध्ये दडलेलं आहे. हा मागच्या शतकामध्ये तयार झालेला अल्गोरिदम. मानवी मेंदू जसे कार्य करतो तसेच संगणकीय अल्गोरिदममध्ये न्यूरल नेटवर्कद्वारे केले जाते. परंतु या न्यूरल नेटवर्कला शिकण्याची क्षमता देण्याचे कार्य जेफ्री हिंटन यांनी केले. २१ व्या शतकामध्ये हे तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले. यानंतरही हिंटन यांनी वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानाला आपले योगदान दिले. गुगलसारख्या कंपन्यांसोबत त्यांनी काम देखील केले. परंतु त्यांचा देखील 'अल्फ्रेड नोबेल' झाला. आपण तयार केलेले तंत्रज्ञान जगाला विनाशाच्या दिशेने नेऊ शकते, याची जाणीव हिंटन यांना झाली होती. २०२२ पर्यंत त्यांना संगणक क्षेत्रातील मानाचा ट्युरिंग पुरस्कार मिळाला आणि विज्ञान क्षेत्रातील सर्वोत्तम नोबेल पुरस्कार देखील!
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं तंत्रज्ञान चुकीच्या दिशेने विकसित झाल्यास किंवा चुकीच्या हातांमध्ये गेल्यास ते विनाशकारी ठरू शकतं याची जाणीव हिंटन यांना होती. त्यातूनच त्यांनी या तंत्रज्ञानाविषयी प्रबोधन करण्याचे कार्य हाती घेतले. जे आजतागायत अविरतपणे चालू आहे.
माझा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू देखील हाच होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे जवळपास सर्वांनाच माहीत झालं आहे. परंतु भविष्यातील त्याचा विकास आपल्याला कोणत्या वाटेवर नेऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर तात्विकदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोधणे गरजेचे वाटते. हिंटन यांच्या विचारांची मला मदत झाली. आणि हे पुस्तक मी लिहू शकलो.
हेन्री डेव्हिड थोरो त्याच्या वॉल्डन या पुस्तकामध्ये म्हणतो की, एखादे पुस्तक तुम्हाला जर विचार करायला लावत नसेल, तर ते निरर्थक आहे. अतिशय बहुमोलाचा विचार थोरो याने मांडला होता. त्यालाच अनुसरून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या पुस्तकाची रचना मी केली. आज वाचकांच्या अनुभवातून ती सार्थ झाल्याचे देखील मला वाटते.
--- तुषार भ. कुटे
Monday, February 2, 2026
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्पणपत्रिका
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com