Tuesday, January 6, 2026

झाला आनंद आली बहार !

तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की, एखादा विषय सतत डोक्यात घोळत राहतो. त्यावर आपण अनेकदा विचार मंथन करतो. आपले विचार देखील सातत्याने विविध ठिकाणी मांडत राहतो आणि एक दिवस एका चित्रपटाच्या माध्यमातून आपले सर्व विचार पडद्यावर दिसायला लागतात....  
आमचं सांगायचं झालं तर "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" या चित्रपटाद्वारे असंच काहीतरी आमच्या बाबतीत घडलं. हेमंत ढोमेने या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासूनच चित्रपट प्रदर्शित होण्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत होतो. तो प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पहायचा होता. परंतु काही कारणास्तव शक्य झाले नाही.
का कुणास ठाऊक पण चित्रपट पडद्यावर सुरू झाला, श्रेय नामावली दिसायला लागली आणि हलकेच माझ्या स्वतःच्या शाळेच्या आठवणी जागृत झाल्या. नकळतपणे डोळ्यांमध्ये पाणी तरळू लागले होते. एका अर्थाने अगदी पहिल्या सेकंदापासून मी चित्रपटांमध्ये गुंतून जाऊ लागलो. हा चित्रपट मराठी शाळांच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करतो. याविषयी सर्वांनाच कल्पना आहे. परंतु मराठी भाषा हा विषय केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा पुढे सरकते, असे मला जाणवले. मागच्या काही वर्षांपासून आपल्या भाषेविषयीची मतमतांतरे विविध माध्यमांद्वारा प्रसूत होताना दिसतात. उत्तरेकडील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी स्थलांतरे आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये इंग्रजी माध्यमाचं वाढत चाललेलं प्रस्थ या दोन बाबींमुळे महाराष्ट्रामध्ये मराठीचं अस्तित्व धोक्यात आलेले आहे. दोन्ही गोष्टी एका अर्थाने राजकारणाशी निगडित. परंतु यातील दुसरी गोष्ट अर्थात मराठी शाळांची अवस्था हा ही सर्वसामान्य लोकांच्या हातात असलेली. मागच्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेल्या अनेक प्रसिद्ध आणि बड्या व्यक्ती या मराठी माध्यमातूनच शिकलेल्या आहेत. मराठी भाषेतून अर्थात आपल्या मातृभाषेतून त्यांनी ज्ञानग्रहण केले व प्रगतीचा मार्ग शोधला. परंतु जागतिक भाषा म्हणून उदयास आलेल्या इंग्रजीने नवपालकांना आकर्षित केले. शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा त्यांना सुविधा महत्त्वाच्या वाटू लागल्या. आणि याच कारणास्तव मराठी शाळा बंद व्हायला लागल्या. इंग्रजी शाळेत किती ज्ञान मिळते? हा संशोधनाचा विषय आहे. परंतु स्टेटसचा विषय तयार झाल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. अशाच एका बंद होत असलेल्या शाळेसाठी उभ्या ठाकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची गोष्ट या चित्रपटामध्ये अत्यंत प्रभावीपणे हेमंत ढोमे याने मांडलेली आहे. चित्रपट एका सामाजिक प्रश्नावर भाष्य करत असला तरी देखील अनेक प्रसंग विनोदी ढंगाने दाखवलेले आहेत. शाळेतल्या जुन्या आठवणी ताजे करणारे प्रसंग आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. आठवणींमध्ये रमायला लावतात. आणि हलकेच पापण्यांच्या कडा ओलावतात देखील... 
एक गोष्ट मात्र खरी की भाषा वाचवायची असेल तर सर्वप्रथम त्या भाषेच्या शाळाच वाचवायला हव्यात. आपण ज्या भाषेतून शिकलो त्या भाषेविषयी मनामध्ये अत्युच्च प्रमाणात आपुलकी असते. आणि म्हणूनच ही भाषा पुढच्या पिढीकडे जाते. परंतु शाळाच टिकल्या नाही तर भाषा टिकणे अत्यंत अवघड आहे. असा मोलाचा संदेश हा चित्रपट आपल्याला देतो. इंग्रजी बोलणं हे एक कौशल्य आहे. त्याकरता मातृभाषेतील शिक्षणाचा गळा अनेक पालक घोटताना दिसत आहेत. बाकी कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सर्वांच्याच भूमिका दमदार आहेत. त्यातही अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांना तोडच नाही. दिग्दर्शन आणि संवाद लेखनासाठी १०० पैकी १०० गुण.
आज हा चित्रपट चार कोटींचा गल्ला प्राप्त करून घोडदौड करत आहे. तरी अजूनही इंटरनॅशनल स्कूलच्या बाबतीत आग्रही असणाऱ्या अनेक पालकांनी हा चित्रपट पाहिला नसावा. त्यांनी चित्रपटगृहात जाऊन किमान हा चित्रपट पहावा, हीच अपेक्षा. हा एक केवळ चित्रपट नाही तर डोळे मिटून दूध पिणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. तो फक्त मनोरंजनासाठी किंवा मराठी चित्रपटांचा प्रसार करण्यासाठी बघू नका.... त्यातून बोध घ्या आणि आचरणात देखील आणा... 
इतकी उत्तम कलाकृती सादर केल्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे शतशः आभार... 

--- तुषार भ. कुटे


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com