मागच्या दशकभरापासून मराठी भाषा हा सातत्याने राजकारणाचा विषय होऊ लागला आहे. भाषा हीच आपली ओळख आणि आपली संस्कृती असते. परंतु जेव्हा स्वभाषिक लोकांनाच तिचा विसर पडायला लागतो तेव्हा खरोखर विविध माध्यमांद्वारे समाज प्रबोधनाची गरज भासते. "क्रांतीज्योती विद्यालय- मराठी माध्यम" या चित्रपटाने देखील अशाच समाज प्रबोधनाची वाट जोखलेली आहे.
महाराष्ट्र हे देशातील एक अष्टपैलू राज्य. ज्याने अनेक विभूतींना जन्म दिला. यातील अनेकांनी आपल्या देशाचे नाव जगात गाजवले. विशेष म्हणजे जवळपास सर्वच जण आपल्या मातृभाषेतून शिकले होते. मातृभाषेतील शिक्षणातून त्यांचा पाया पक्का होत गेला. शिवाय अप्रत्यक्षपणे आपल्या मराठी भाषेचा देखील प्रसार झाला. परंतु मागच्या दोन-एक दशकांपासून जागतिक भाषा म्हणवल्या गेलेल्या इंग्रजी माध्यमातील शाळांचे प्रस्थ वेगाने वाढत आहे. अगदी पहिल्यापासूनच आपल्या मुलांनी इंग्रजीतुन शिक्षण घेतले की आपण जागतिक नागरिक बनू. शिवाय भविष्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असं नवपालकांना वाटू लागले आहे. आता केवळ इंग्रजी हेच भविष्य. त्यामुळे इंग्रजी भाषेतून शिकण्यास पर्याय नाही. असे विविध गैरसमज तयार झाल्याने विविध इंटरनॅशनल बोर्डांच्या आंतरराष्ट्रीय शाळा तयार झाल्या. त्यांनी फाईव्ह स्टार सुविधा द्यायला सुरुवात केली. आणि यातून एक शैक्षणिक अर्थव्यवस्था तयार झाली. इंग्रजीतून शिकलो नाही म्हणूनच आम्ही मागे पडलो, असा अनेकांचा समज झालेला आहे. म्हणूनच मराठी लोक आता आपली पुढची पिढी इंग्रजीतून शिकवित आहेत. या पिढीचे ज्ञानग्रहण व समज कितपत विकसित झाली आहे? हा संशोधनाचा विषय. परंतु यामुळे लाखा-लाखांवर पैसे भरून पालक इंग्रजी शाळांचा गल्ला भरत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ मराठी शाळांमध्ये ज्ञान दिले जात नाही का? यापूर्वीची पिढी मराठीतूनच शिकली. आज सर्वजण आत्मविश्वासाने विविध ठिकाणी कार्य करत आहेत. पण तरी देखील अनेकांना मराठी भाषेतून आपल्या मुलांना शिकवायचे नाही. असे का? तर याचे पहिले उत्तर आहे स्टेटस...
इंग्रजी भाषा म्हणजे लय भारी. इंग्रजी ही जगाची भाषा. इंग्रजी शाळा म्हणजे हाय-फाय शाळा. इंग्रजी शाळा म्हणजे इंटरनॅशनल शाळा. अशा बऱ्याच गोष्टींमुळे इंग्रजी या नावाभोवती एक स्टेटस तयार होत गेलेले आहे. म्हणूनच मराठी शाळा आता "डाऊनमार्केट" झालेल्या आहेत. पालकांना आपलं मूल इंटरनॅशनल स्कूलमधून शिकतं, हे सांगायला अतिशय अभिमान वाटतो. ते मूल कितपत शिकतं? याविषयी त्यांनाही फारशी माहिती नसावी. एखाद्या शाळेची फी जितकी जास्त तितकी शाळा भारी, या गैरसमजातून इंग्रजी शाळा वाढतायेत आणि मराठी शाळा मागे पडत आहेत. जे शिक्षण इंग्रजीतून मिळतं तसंच किंबहुना त्याहून अधिक व्यवस्थित समजणारं मराठी शाळेतूनही मिळतं. पण मराठी शाळेला स्टेटस नाही... काय करायचं?
इंग्रजीतून शिकणं आणि इंग्रजी शिकणं यामध्ये खूप फरक आहे, याची कल्पना आजही अनेकांना नाही. एखाद्या परभाषेतून ज्ञानग्रहण करत असताना बुद्धीची समज तोकडी पडते. आणि मग मेंदूचा हवा तितका विकास होत नाही, असं भाषातज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांचा देखील मत आहे. परंतु पालकांना याचे काहीही पडलेले नाही. स्वतः एका छोट्या गावातल्या ग्रामीण मराठी शाळेतून शिकून त्यांनी प्रगतीची द्वारे स्वतःसाठी खुली केली. संघर्ष केला. त्यातूनही शिकले. परंतु मुलाच्या बाबतीत असे पालक मातृभाषेतील शिक्षणाविषयी आग्रही नाहीत. त्यांनी 'का?' हा प्रश्न स्वतःला विचारावा.
क्रांतीज्योती चित्रपटामध्ये अखेरच्या प्रसंगामध्ये मुख्याध्यापक शिर्के सर हे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी बऱ्याच गोष्टी सांगतात. त्या सर्वांनी ऐकण्यासारख्या अशा आहेत. आणि अनेक विचार हे सुविचारासारखे लिहून ठेवण्यासारखे आहेत. तसेच प्रामुख्याने आचरणात आणण्यासारखे आहेत. आपली बुद्धी विकसित झाली, पण त्याचा योग्य वापर आपण करतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला मानसिक समाधानापेक्षा भौतिक सुखांची ओढ असते. अर्थात तो मानवी स्वभाव आहे. पण यातून आपण काय गमावतो, हे वेळ गेल्यानंतरच लक्षात येते. इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते.
मागच्या काही वर्षांपासून मी असे अनेक पालक पाहिलेले आहेत, ज्यांचं मोठं मूल इंग्रजी माध्यमात तर लहान मुल मराठी माध्यमात शिकत. असं का बर होत असावं? अर्थातच या प्रश्नांची उत्तरे मी वरच्या परिच्छेदांमध्ये दिलेली आहेतच.
विषय मराठी शाळा वाचवण्याचा आहेच... पण पुढील पिढी घडवण्यासाठी मनाला भिडणारं, समजणारं मातृभाषेतील शिक्षण गरजेचं आहे. त्यातूनच सुजाण नागरिक तयार होणार आहेत. जे विचारी असतील, संवेदनशील असतील आणि त्यांच्याकडे उच्च दर्जाची निर्णयक्षमता देखील असेल.
अर्थातच या सर्वांचे फलित असे की, शाळा टिकल्याने आपली भाषादेखील टिकेल.... आणि संस्कृतीसुद्धा!
--- तुषार भ. कुटे
Saturday, January 10, 2026
"क्रांतीज्योती"च्या निमित्ताने...
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com