Monday, January 19, 2026

तंत्रज्ञान आणि अनुवाद

"प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या माझ्या नव्या पुस्तकाची समाजमाध्यमावर पोस्ट केल्यानंतर काही दिवसांमध्ये एका वाचकाचा मला मेसेज आला. 'सर तुम्ही कोणत्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करून हे पुस्तक लिहिले आहे?' अर्थातच हा प्रश्न काही आश्चर्यकारक नव्हता. यापूर्वी देखील 'पायथॉन प्रोग्रामिंग'च्या वेळेस दोन जणांनी मला असा प्रश्न विचारला होता. 
मूलतः भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञानाचे ज्ञान तयार होत नाही किंवा लिहिले जात नाही, हा भारतीय लोकांचा गैरसमजच. संगणक तंत्रज्ञानाचा उदयच पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. मुख्यत्वे इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये म्हणजेच अमेरिका आणि इंग्लंडसारख्या राष्ट्रांमधील संगणक विकसकांनी या तंत्रज्ञानाला गती दिली. त्यामुळे त्यांचे ज्ञान हे त्यांच्याच इंग्रजी भाषेमध्ये लिहिले गेले. परंतु युरोपियन देशांनी मात्र इंग्रजीतील हे ज्ञान स्वतःच्या भाषेमध्ये लिहिले. आजही त्यांची जवळपास सर्वच पुस्तके स्थानिक भाषेमध्ये लिहिलेली असतात. अनेक शतकांपूर्वी आपल्या देशामध्ये संस्कृत भाषेविषयी जी परिस्थिती होती तीच आज इंग्रजीच्या बाबतीत आहे. त्या काळात ज्ञान फक्त संस्कृत भाषेमध्येच लिहिले गेले होते. परंतु कालांतराने अनेक विभूतींनी प्रयत्नपूर्वक सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये लिहून त्यांना समाजज्ञानाची ओळख करून दिली. 
भारतामध्ये मात्र संगणक तंत्रज्ञानाची ओळख व्हायला काही दशके जावी लागली. या तंत्रज्ञानाची आपल्याला बऱ्याच उशिरा आणि संथपणे ओळख झाली. इथल्या विकसकांनी इंग्रजी भाषा आत्मसात करून, पाश्चिमात्य पुस्तकांचा अभ्यास करून संगणक क्षेत्रामध्ये शिरकाव केला. मागच्या शतकामध्ये तंत्रज्ञानाची माहिती आपल्या भाषांमध्ये आणण्यासाठी कुणी प्रयत्न केल्याचे मला आठवत नाही. परंतु मागच्या दहा-पंधरा वर्षांपासून हळूहळू संगणक ज्ञान आपल्या भाषांमध्ये तयार होत आहे. या क्षेत्रामध्ये अनुवादित पुस्तके जवळपास नाहीतच. पाश्चिमात्य लेखकांनी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके अनुवादित होऊन भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झालेली आहेत. परंतु तंत्रज्ञान क्षेत्राची अशी परिस्थिती नाही. भारतीय भाषांमध्ये पुस्तके नगण्य असली तरी ती बहुतांश इथल्याच लेखकांनी लिहिलेली आहेत. अर्थात मी देखील माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून 'पायथॉन प्रोग्रामिंग', 'डेटा सायन्स' आणि 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' अशी आजच्या युगातील तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह आपल्या भाषेमध्ये लिहिली. खरं सांगायचं तर हे तंत्रज्ञान शिकताना मी अनेक पुस्तकांचा वापर केला होता. परंतु मराठीतून पुस्तक लिहिताना केवळ अनुभवाचाच वापर झाला. यासाठी कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचा संदर्भ घेतला नव्हता. वाचकांच्या दृष्टिकोनातून शिकण्याचा प्रवाह कसा असावा? कोणत्या प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव या पुस्तकांमध्ये असावा? तसेच एखादी संकल्पना आपल्या भाषेमध्ये कशा पद्धतीने सहज व सोपी करून सांगता येईल? अशा विविध प्रश्नांचा विचार करूनच मी पुस्तकांची रचना केली आहे. यावर्षी रोबोटिक्स, संगणकायन, प्रॅक्टिकल मशीन लर्निंग, प्रॅक्टिकल न्यूरल नेटवर्क, प्रॅक्टिकल कॉम्प्युटर व्हिजन, प्रॅक्टिकल नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, प्रॅक्टिकल जनरेटिव्ह एआय, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, एआय आणि क्रिएटिव्हिटी, एआय आणि गूढ प्रश्नांची उकल, ड्रॅगनच्या विळख्यात एआय आणि मशीनचे मन अशी विविध पुस्तके मराठी भाषेतून प्रसिद्ध करण्याचा माझा मानस आहे. अर्थात केवळ इंग्रजीत वाचकांना असणारे ज्ञान सर्वसामान्य मराठी जनापर्यंत पोहोचावे, या एकमेव उद्देशाने या पुस्तकांचे लिखाण चालू आहे. हळूहळू एकेक पुस्तक मराठी वाचकांपर्यंत पोहोचेल. त्यांनाही यातून तंत्रज्ञानाची सखोल ओळख होईल, असा मला दृढ विश्वास आहे. 

--- तुषार भ. कुटे

 


 

 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com