आज पुणे ग्रँड टूर स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि पुण्यातले रस्ते बंद करण्याचा पण.... याचं वेळापत्रक कालच आलं होतं. सकाळी नऊ वाजल्यापासूनच पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले बरेचसे रस्ते बंद होणार होते. त्यामुळे जोखीम नको म्हणून सकाळी साडेसात वाजताच बाईक घेऊन मार्गस्थ झालो.
मागच्या काही दिवसांपासून या स्पर्धेच्या तयारीची क्षणचित्रे शहरांमधल्या रस्त्यांवरून अनुभवत होतो. आज ती पूर्णतः पाहायला मिळाली. देहू-आळंदी रस्ता पार करून स्पाईन रोडला लागलो. गेली कित्येक वर्षांपासून पहिल्यांदाच हा रस्ता छान नटलेला दिसत होता. रस्त्यावर कुठेही घाण नाही. अगदी रस्त्यांच्या झाडांचा पालापाचोळा देखील पडलेला नव्हता. सकाळी सकाळीच स्वच्छता कर्मचारी तो साफ करत होते. थोड्याच वेळात भोसरी एमआयडीसी मधून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागलो. एमआयडीसीतल्या कंपन्यांमधून येणाऱ्या धुराचा आणि केमिकलचा वास घेत टाटा मोटर्सच्या रस्त्यावर पोहोचलो. आज या रस्त्यावर गाडी चालवण्याची अनुभूती काहीतरी वेगळीच होती. काळे कुळकळीत आणि सपाट गुळगुळीत रस्त्यांवरून सुसाट वेगाने गाडी चालवू लागलो. दुभाजक चक्क पाण्याने धुऊन काढलेले होते! त्यांच्यावर काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे देखील मारले होते. मागच्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाणी पिऊन दुभाजकावर लावलेली झाडे सुंदर टवटवीत दिसू लागली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सफाई कर्मचारी अजूनही कचरा झाडून घेत होते. कुठेही कोणत्या प्रकारचे अतिक्रमण नाही. सकाळी सकाळी पादचारी देखील पदपथाचा अर्थात फुटपाथचा वापर करत होते. रोज रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या गाड्या आज तिथे पार्क केलेल्या नव्हत्या. रस्त्याकडेच्या बांधकाम विभागाच्या सर्व फलकांवर पुणे ग्रँड टूरचा शुभंकर आणि बोधचिन्ह लावलेले होते. रस्ता इतका गुळगुळीत की सायकल स्वाराच्या बाटलीतील पाणीदेखील हलणार नाही. इतके दिवस सायकल चालवतोय पण अशा रस्त्यांवर सायकल चालवण्याची संधी कधीच मिळाली नाही, याची मात्र वाईट वाटले.
झोपडपट्टीची वस्ती असलेल्या ठिकाणी पूर्ण रस्त्याला पांढरे कापड लावलेले होते. गरिबी मिटवण्याऐवजी ती झाकण्यास सोपे असते, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. थोड्याच वेळात पुन्हा एमआयडीसीमध्ये घुसलो आणि रस्त्यांची श्रीमंती गरिबीमध्ये बदलून गेली. पुणे-नाशिक महामार्गावर तीच वर्दळ चालू होती. इथला कचरा तसाच होता. पालापाचोळा कित्येक दिवसांपासून तसाच रस्त्याच्या कडेला पडलेला होता. आजूबाजूची वाहनेच त्याची हालचाल करवत होती.
नाशिक फाट्यावरून दापोडी आणि पुढे नदी ओलांडून बोपोडीच्या पुलाखालून पुणे विद्यापीठाच्या दिशेला लागलो. नदीच्या काठावर इथे येणारी दुर्गंधी तशीच होती. कदाचित सायकलस्वारांची वारी या रस्त्याने जात नसावी, हे समजले. अनाधिकृत फलकमुक्त झालेल्या पिंपरी-चिंचवड मधून पुणे मनपा हद्दीमध्ये पोचल्यावर नवनियुक्त नगरसेवकांच्या अभिनंदनचे भलेमोठे फलक पुन्हा दृष्टीस पडले. कदाचित हा देखील सायकल स्वारीचा मार्ग नव्हता. मग स्पायसर चौक, ब्रेमेन चौक करत पुणे विद्यापीठ रस्त्याला लागलो. आणि पुणे महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांची लगबग दिसायला लागली. आजूबाजूच्या भिंती छानपणे रंगवलेल्या त्यावर पुन्हा बोधचिन्ह आणि शुभंकर...! रस्त्यावर रोज मुक्तपणे संचार करणारी आणि एकमेकांवर सतत कुरघोडी करत भुंकणारी भटकी कुत्री आज एका कोपऱ्यामध्ये घोळका करून उत्सुकतेने पाहत होती. आज त्यांना कदाचित मारून मुटकून एका जागेवर बसवले असावे! आज कोणता सण आहे की काय? याची उत्सुकता त्यांच्या डोळ्यात देखील दिसत होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रस्ते देखील तसेच काळे कुळकुळीत आणि सपाट गुळगुळीत....
पाषाण रोडवर रस्त्याला मारलेले पांढरे पट्टे अतिशय उठून दिसत होते. आज पहिल्यांदाच लक्षात आले की हा रस्ता तब्बल चार पदरी आहे! इथल्या ही दोन्ही बाजूंना भिंतीवर रंगवलेले शुभंकर आणि बोधचिन्ह पुन्हा मिरवत होते. मागच्या बऱ्याच वर्षांपासून पाहत आलेले फळविक्रेते त्यांच्या अतिक्रमण केलेल्या फुटपाथवर दोन दिवसांपासून नव्हते. ती जागा अतिशय स्वच्छ आणि रंगवलेली दिसली....
इच्छितस्थळी पोहोचलो तेव्हा या सर्वांचा विचार केला. आपल्याकडच्या प्रशासन प्रणाली सर्वकाही करू शकतात. शहरे स्वच्छ ठेवता येतात. अतिक्रमण मुक्त करता येतात. सर्वकाही शिस्तबद्ध चालवता येऊ शकतं. शहरी जीवनमान वाहतूक सुसह्य करता येऊ शकते. पण प्रशासन ते करत नाही. जेव्हा गरज असेलच तेव्हाच ही यंत्रणा पूर्ण शक्तीनिशी कार्यरत होते. एकदा सर्वकाही संपलं की पुन्हा जैसे थे!
--- तुषार भ. कुटे
Friday, January 23, 2026
आजि मी स्वच्छ शहरे पाहिली!
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com