Wednesday, January 21, 2026

पैसावाटप

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे इतर स्थानिक पातळीवरील निवडणुका फारशा गाजत नाहीत किंवा त्यांना ग्लॅमरही तितके प्राप्त होत नाही. परंतु यावेळेसच्या महानगरपालिका निवडणुका इतर वेळेपेक्षा वेगळ्या भासल्या. मागच्या पाच-सहा वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललेल्या घडामोडींचा प्रभाव या निवडणुकांवरती होणार होता. आणि तो झालाही. राजकारणामध्ये होणारी पैशाची भली मोठी उलाढाल पाहता सर्वच राजकीय पक्षांमध्ये तसेच पक्षाच्या उमेदवारांमध्ये सत्ताकारणात सहभागी होण्याची अतिव आकांक्षा दिसून आली. एकंदर पक्षनिष्ठा किंवा समाजकारण नावाच्या गोष्टी आता राजकारणातून लुप्त होत जाताना दिसत आहेत. 
निवडणुकांमध्ये दरवेळेसच पैसावाटप बेसुमारपणे होत असते. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही अशा बऱ्याच चर्चा मी आजूबाजूला ऐकल्या. त्या खऱ्याही असाव्यात. आजही लोकशाहीतील मतदाराला आपले मत किती महत्त्वाचे आहे, याविषयी काहीही पडलेले नाही. निवडणुका आल्या की बरेच लोक जोपर्यंत एखाद्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराकडून पैसे येत नाही तोपर्यंत मतदानालाही जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. समाजव्यवस्थेतील शेवटच्या स्तरावरील जनता तसेच झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक अनेकदा अशा पद्धतीने पैसे घेऊन मतदान करताना ऐकलेले आहे. कोणत्या भागामध्ये पैसे वाटले की मते मिळतात, याची इत्यंभूत माहिती राजकारण्यांच्या कार्यकर्त्यांना असते. यावेळेसही पैसे वाटप होणार हे माहीत होते. परंतु यंदाच्या निवडणुकांमध्ये मी बरेच असेही लोक पाहिले की जे मोठमोठ्या सोसायटीमध्ये राहतात, त्यांनी देखील विविध पक्षांच्या उमेदवाराकडून तब्बल दहा-दहा हजार रुपये घेऊन मतदान केले होते. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या आणि महानगरपालिकेमध्ये मतदानाचा अधिकार असणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडूनच कोणता उमेदवार किती पैसे देत आहे? याची माहिती मिळाली होती. अनेक उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकांनी देखील पैसे घेऊन मतदान केल्याचे ऐकिवात आले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. मागच्या पाच-सहा वर्षातील राजकारणाचा खेळखंडोबा पाहता, कुणीही आले तरी काहीही फरक पडत नाही, आपल्याला पैसे मिळणे महत्त्वाचे. अशा मानसिकतेतूनच सर्वच लोक उमेदवाराकडून पैसे घेऊन त्यांना मतदान करताना यंदा पहिल्यांदाच दिसून आले. हा भयानक पायंडा पडायला २०२६ ची महानगरपालिका निवडणूक कारणीभूत ठरताना दिसली. लोकशाही सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तेच लोक तिला पायदळी तुडवताना दिसले. हा भारतासारख्या मोठ्या लोकशाहीचा पराभवच आहे. 

--- तुषार भ. कुटे


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com