मराठी चित्रपटांसाठी जसे ए-सर्टिफिकेट असते तसं जर पुस्तकांना दिलं तर त्यामध्ये काही पुस्तकांचा समावेश करता येईल. त्यातीलच हृषिकेश गुप्ते लिखित "परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष" हा दोन दीर्घ कथांचा संग्रह.
या दीर्घ कथासंग्रहातील पहिली कथा अर्थात शीर्षक कथा आहे. वेगळ्या ढंगाने लिहिलेली. मला तिच्यामध्ये पाश्चिमात्य लेखकांच्या शैलीचा प्रभाव जाणवला. यामधील पात्रांना सातत्याने त्यांच्या कामावरून आणि विशेषणाने संबोधले आहे. जसे की सतत पत्त्यांचे बंगले बांधणारे घारे गोरे मॅनेजर साहेब, सतत प्रवास करणारा शाई एजंट, सतत पतंग उडवणारा फोल्डिंगचा पुरुष, सतत रेडिओ ऐकणारा अल्लाबक्ष चहावाला, सतत काम करणारा तुकाराम बाईंडर, सतत लोकांच्या भेटीगाठी घडवून आणणारे सर. हे वाचायला थोडं विचित्र आणि मनोरंजक वाटतं. पण ही शैली भन्नाट आहे. परफेक्टच्या बाईने तिच्या दुसऱ्या विवाहासाठी रचलेले स्वयंवर आणि त्या स्वयंवरासाठी घातलेली विचित्र अट तसेच या अटीची पूर्तता करणारे महाविचित्र लोक... असे सर्वच विचित्र-विचित्र आहे!
अखेरीज या स्वयंवरामध्ये एकाचा विजय होतो. अर्थातच हा शेवट अनपेक्षित आहे. तो असा का झाला? या प्रश्नाचे उत्तर देखील लेखकाने स्पष्टीकरणासह दिले आहे.
कथासंग्रहातील दुसरी कथा म्हणजे "तिळा दार उघड..." ही गोष्ट आहे तिलक नावाच्या एका मुलाची आणि युवकाचीही. त्याच्या तिलक नावामागे छानसा आणि मजेशीर इतिहास आहे. हाच धागा पकडून संपूर्ण कथा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहते. तिलकला लाभलेलं दैवी वरदान त्याच्या आजूबाजूच्या सर्वांना समजत असतं. त्याचा तो गैरफायदा घेतो. परंतु एका अर्थाने त्याने स्वतःलाच फसवलेले असते. यातून तो कसा मार्ग काढतो? तसेच त्याच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या घटना घडत राहतात? अशा विविध प्रश्नांची उत्तरे कथेच्या अखेरीस आपल्याला मिळतातच. दोन्ही कथा वेगाने सरकणाऱ्या... याच कारणास्तव एकदा सुरुवात केली की शेवट करूनच पुस्तक खाली ठेवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आहेत.
--- तुषार भ. कुटे
Tuesday, January 20, 2026
परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष - हृषिकेश गुप्ते
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com