विद्या प्रतिष्ठानच्या “शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या संस्थेला भेट देण्याचा योग आला. मागच्याच आठवड्यामध्ये या संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन झाले होते. मी स्वतः आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने या नव्या संस्थेविषयी माझ्या मनातही कुतूहल होते. प्रत्यक्ष संस्थेला भेट दिल्यानंतर मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. परंतु या तंत्रज्ञानाच्या विकसनाचा विचार केल्यास अजूनही भारत अनेक देशांच्या कित्येक मागे असल्याचे दिसते. किंबहुना आपले आपली विद्यापीठे तसेच तंत्रज्ञान संस्था एआय विकसित करण्याच्या दृष्टीने लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही फारशा गांभीर्याने उपलब्ध करून देताना दिसत नाहीत. म्हणूनच या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय विकसकांना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी क्लाऊडचा वापर करून तंत्रज्ञान एका अर्थाने उसने घ्यावे लागते. परंतु विद्या प्रतिष्ठानच्या या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञान तसेच इन्फ्रास्ट्रक्चर मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्याचे दिसून आले. शिवाय डेटा सायन्स, बिझनेस इंटेलिजन्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग, सायबर सेक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स अशा विविध एआय आधारित शाखांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळांची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ड्रोन आणि इंटरनेट ऑफ थिंग्समधील उत्पादने तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हार्डवेअरची गरज असते. आणि ही अद्ययावत हार्डवेअर्स अतिशय महाग असतात. विद्यार्थ्यांना यामध्ये प्रकल्प विकसित करायचे असल्यास खर्चिक होते. ही सर्व प्रकारचे हार्डवेअर्स इथल्या प्रयोगशाळांमध्ये दिसून आली.
पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील निमशहरी ठिकाणी अशा प्रकारच्या प्रयोगशाळा असणारी संस्था म्हणजे आश्चर्यच होते. या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर मला अजूनही पुण्यातल्या कोणत्याही विद्यापीठात किंवा तंत्रज्ञान संस्थेमध्ये दिसलेले नाही. ज्या तंत्रज्ञानाला गांभीर्याने घ्यायला हवे ते अजूनही मोठमोठ्या संस्था घेत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. म्हणूनच बारामती सारख्या छोट्या शहरामध्ये विद्या प्रतिष्ठानने उभारलेला हा उपक्रम खरोखर स्पृहणीय आणि अभिनंदन असाच आहे.
— तुषार भ. कुटे
#AI #ArtificialIntelligence
Friday, January 9, 2026
शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com