Saturday, January 31, 2026

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सर्वोत्तम कोर्स कोणता?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थांपैकी एक म्हणजे डेक्कन कॉलेज होय. या कॉलेजची स्थापना सन १८२१ मध्ये झाली होती.
आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच डेटा सायन्स क्षेत्रातील ट्रेनिंगमध्ये अग्रगण्य असणारी पुण्यातील संस्था म्हणजे मितू स्किलोलॉजीज होय. या संस्थेला गुगलवर सर्वाधिक रेटिंग आणि रिव्ह्यूज आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी या दोन्हीही संस्था संयुक्तपणे 'जेनेसिस एआय कोर्स' ऑनलाईन पद्धतीने चालवतात. ज्यामध्ये तब्बल तीन सर्टिफिकेशन कोर्स करता येतात.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची डिग्री करत असलेला विद्यार्थी आणि सर्व प्रकारचे पदवीधर या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. तुम्ही जरी कोणत्याही महाविद्यालयामध्ये शिकत असाल तरीदेखील पॅरलली हा कोर्स करू शकता. कारण तो संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत चालवला जातो.
या कोर्समध्ये पायथॉन प्रोग्रामिंग, स्टॅटिस्टिक्स, डेटा सायन्स, डेटा ऍनालिसिस, डेटा व्हिज्युलायझेशन, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि जनरेटिव्ह एआय सारख्या विविध टेक्नॉलॉजीला प्रॅक्टिकलद्वारे आणि कॅपस्टोन प्रोजेक्टद्वारे शिकवले जाते.
हा कोर्स शिकवण्यासाठी कंपनीतील अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट, एआय इंजिनियर्स तसेच पीएचडी झालेले प्राध्यापक देखील आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एबीसी बँकेमध्ये तब्बल २४ क्रेडिट्स देखील मिळणार आहेत. तेही डेक्कन कॉलेज सारख्या शासकीय संस्थेकडून...
यातील एका सर्टिफिकेट कोर्स फी आहे फक्त वीस हजार रुपये. आणि त्याकरिता फक्त ६० जणांना प्रवेश मिळतो. तोही फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस वर...!
डेक्कन कॉलेज किंवा मितू स्किलोलॉजीजच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती किंवा तुमचा प्रवेश निश्चित करू शकता.

https://mitu.co.in 

#ArtificialIntelligence #DataScience #GenAI #AgenticAI #pythonprogramming


 

वॉल्डन - हेन्री डेव्हिड थोरो

१८४५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या एका २८ वर्षाच्या युवकाने वॉल्डनच्या तळ्याकाठी राहण्याचा निर्णय घेतला. या तळ्याच्या काठावर तो एक झोपडी बांधून जवळपास दोन वर्ष राहिला. कदाचित त्याला स्वतःवर प्रयोग करायचे होते. मनुष्य कसा जगू शकतो? या प्रश्नाची उत्तरे शोधायची होती. यातूनच हेन्री डेव्हिड थोरो याचे स्वतःचे एक तत्त्वज्ञान तयार झाले. या तत्त्वज्ञानावरच आधारित असणारे पुस्तक, वॉल्डन.
काही गोष्टी आपल्या अनुभवातून साध्य होतात. काही गोष्टींसाठी वेळ यावी लागते तर काहींसाठी आपल्याला तशी वेळ आणावी लागते. वॉल्डनच्या काठावर दोन वर्षे राहिलेला हा तरुण अशाच अनुभवाच्या शोधार्थ भटकत होता. त्यातूनच त्याला जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. तिथल्या निसर्गातून आणि स्वतः अनुभवलेल्या घटनांमधून त्याचं स्वतःच एक तत्त्वज्ञान तयार झालं. या मुक्कामात तो दोन वर्षे पूर्णपणे एकटा नव्हता. त्याला अनेक व्यक्ती तसेच प्राणी देखील भेटले. त्यातूनही त्याचे स्वतःचे मत तयार झाले. त्याला स्वतःबद्दल किंबहुना मनुष्य जीवनाबद्दल विचार मंथन करण्याची संधी मिळाली. याच विचार मंथनावर आधारित हे पुस्तक आहे.
हे पुस्तक म्हणजे जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. माणसाला जगण्यासाठी नक्की काय लागतं? याही प्रश्नाचं सारासार उत्तर देते. शिवाय जीवनातील आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना बहुतांश मार्गदर्शन देखील करते. 
यातील बरीचशी वाक्ये सुविचार म्हणून लिहिण्यासारखी आहेत. तसेच सार्वजनिक जीवनामध्ये आचरणात आणण्यासारखी देखील आहेत. एक अर्थाने आदर्श जीवन पद्धतीचा ती पुरस्कार करतात.

— तुषार भ. कुटे


Thursday, January 29, 2026

अजितदादा

आपला देश म्हणजे राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यावर भरभरून प्रेम करणारा देश. परंतु, हे प्रेम सर्वांनाच मिळत नाही. आपल्या कार्यातून, व्यक्तिमत्वातून लोकांच्या मनावर राज्य करणारे अतिशय कमी लोक आपल्या देशात आहेत. त्यातीलच एक अजितदादा पवार. 
सकाळी सकाळीच आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वच जण सुन्न झाले. अजितदादा इतक्या लवकर जाऊच शकत नाहीत. अशीच सर्वांची भावना होती. परंतु सत्य हे कटू असते. याची जाणीव काल प्रकर्षाने झाली. ज्या व्यक्तीला आपण कधीच भेटलो नाही आणि केवळ बातम्यांमधून पाहत आलेलो आहे, त्यांच्याविषयी इतके वाईट का वाटावे? हा प्रश्न मला पडला.
खरंतर या व्यक्तीने आपल्या कामांमधून, धडाडीतून जी ओळख निर्माण केली तीच ओळख मनामध्ये घर करून राहिली होती. आपल्या राज्याला असाच नेता हवा आहे, ही भावना मनात तयार झाली होती. राज्याला सांभाळणारा नेता असाच असेल, असं वाटू लागलं होतं. पुढची अनेक वर्षे महाराष्ट्र ज्याच्या हातामध्ये बिनधास्तपणे सोपवू शकतो, असा हा नेता होता. परंतु त्याच्या अकाली जाण्याने बसलेला धक्का पचवू शकलो नाही. एखाद्या राजकीय नेत्याबद्दल पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने वाईट वाटले. कालपासून अवघा सोशल मीडिया दादांवरील बातम्यांनी आणि भरभरून लिहिल्या गेलेल्या लेखांनी ओसंडून वाहतो आहे. ही त्यांच्या कामाची आणि लोकांच्या प्रेमाची खरी पावती आहे. अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी भरून काढता येत नाही. अजितदादा देखील त्यातीलच एक. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांच्या नावाशिवाय काहीही लिहिले जाणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. शिवाय त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील नेते तयार होतील जे महाराष्ट्रा च्या प्रगतीचा वेग असाच कायम चालू ठेवतील, अशी आशा बाळगूया. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल.

--- तुषार भ. कुटे.

(कोणत्याच राजकीय नेत्याबद्दल मी आजवर काहीच लिहिलेले नाही. पण आज राहावले नाही.)


 

हॅरियर ईव्हीची पहिली ड्राईव्ह

२५ जानेवारीला संध्याकाळी पंचजन्यच्या शोरूममधून फोन आला. आमची हॅरियर ईव्ही गाडी शोरूममध्ये दाखल झाली होती. हायसे वाटले. अर्थात २७ जानेवारीला आम्हाला गाडी मिळणार होती, हे नक्की झाले. यामुळे पुढच्या तयारीला लागलो.
२६ जानेवारीला अर्थात आदल्या दिवशी कुटुंबातील सर्वच जण मोशीला घरी थांबले होते. २७ तारखेला दुपारी बारा वाजता गाडी घेऊन निघू असे नियोजन केले. रश्मी आणि मी ज्ञानोबाला आणण्यासाठी शाळेमध्ये गेलो होतो. तिथून थेट पंचजन्यच्या शोरूममध्ये गेलो. गाडी शोरूमच्या बाहेरच नेहमीच्या ठिकाणी लावलेली होती. गाडीचा क्रमांक अजून आलेला नव्हता. मागच्या वेळेस बुकिंगसाठी आलो त्यावेळेस हॅरियर गाडी पहिल्यांदाच आतून पाहिली. आज मात्र ती सर्व बाजूंनी पाहता आली. सर्व काही औपचारिकता करता करता तीन वाजून गेले होते. शिवाय संध्याकाळी राज्ञीचा वाढदिवस असल्याने लवकर गावी पोहोचणे गरजेचे होते. इथून गाडी गावी न्यायची होती. अमोलच्या आग्रहाखातर मीच गाडी चालवू लागलो. हॅरिअर ईव्ही चालवण्याचा तो माझा पहिलाच अनुभव. आमच्या नेक्सॉन ईव्ही पेक्षा ही गाडी बऱ्यापैकी मोठी, भक्कम आणि भारदस्त वाटत होती. शिवाय गाडीला घातलेला तो भला मोठा हार घेऊन आम्ही थाटाने राष्ट्रीय महामार्गावरून गावाच्या दिशेने निघालो. नेक्सॉन चालवण्याची सवय होतीच, शिवाय त्यातील बऱ्याचशा फंक्शनलिटीज मला आधीच माहीत होत्या. परंतु या गाडीमध्ये त्याहीपेक्षा अद्ययावत फंक्शन्सचा देखील भरणा होता. यानिमित्ताने मला त्याची देखील चाचणी करता आली. गाडी चालवताना वेगळी काही भीती वाटली नाही. फक्त ती सांभाळून गावी नेणे गरजेचे होते. शिवाय गाडीला क्रमांक देखील आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांपासून वाचवत ती आम्ही गावी घेऊन गेलो. एका नव्या गाडीच्या चालविण्याचा आनंद या निमित्ताने मलाही घेता आला. 
 


श्रद्धांजली अजितदादा

मागच्या तीन ते चार दिवसांपासून सतत धावपळ चालू होती. परंतु आजचा दिवस बऱ्याच दिवसांनी आरामातच होतो असंच म्हणावं लागेल. सकाळी ज्ञानोबाला शाळेत सोडून आलो. सगळ आवरलं. आणि कामाला सुरुवात करणार तोवर अजित पवारांच्या अपघाताची बातमी समाजमाध्यमांवर तसेच विविध चॅनेल्सला दिसायला लागली होती. आणि थोड्याच वेळामध्ये अजितदादांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची वार्ताही आली. सर्व काही अनपेक्षित होतं. आणि धक्कादायक देखील. अजित पवारांसारख्या नेत्याचे इतक्या लवकर जाणे मनाला पटले नाही. काही बातम्यांवर फक्त अपघात झाल्याचे दाखवत होते तर काही ठिकाणी त्यांचे निधन झाल्याचेही वृत्त होते. परंतु प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अधिकृत माहितीवर आम्ही विश्वास ठेवला. नंतर सर्वत्रच त्यांच्या निधनाची बातमी आली. मन सुन्न झाले. खरंतर अशा प्रकारची बातमी आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील कोणालाच अपेक्षित नव्हती. सातत्याने कामात गुंतलेले अजितदादा वयाच्या ६६ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यानंतरचे दोन तास फक्त टीव्हीवरच्या बातम्या पाहत होतो. कामात देखील लक्ष लागले नाही. असे कसे झाले असावे? यात काही घातपात तर नाही ना? अशाच वेगवेगळ्या प्रश्नांचे मनात काहूर माजले होते. महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करणारा आजच्या काळातील नेता हे जग सोडून गेला होता.
दुपारी पीएचडीच्या रिव्ह्यूसाठी मला कॉलेजला जायचे होते. माझा रिव्ह्यू आज नव्हताच. पण इतर दोघांच्या रिव्ह्यूसाठी जाणे भाग होते. आज सकाळच्या बातमीमुळे मी अस्वस्थ होतो. कुठे बाहेर जाण्यासाठी अनुत्सुकदेखील. तरीसुद्धा जाणे भाग होते. गाडी काढली आणि ती चालवत असतानाच सातत्याने वाटत होते की आजचा रिव्ह्यू रद्द होईल. थोड्याच वेळात समजले की आज सर्वच महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे. पण आमचा रिव्ह्यू मात्र होणार होता. आज पहिल्यांदाच इतक्या अनुत्सुकतेने महाविद्यालयात पोहोचलो. मनात अजूनही ती बातमी घर करून होती. कदाचित या वर्षातील ती सर्वात बातमी वाईट बातमी असावी.

--- तुषार भ. कुटे


 

Tuesday, January 27, 2026

'कंट्रोल झेड': चुका सुधारणारी डिजिटल जादू

संगणकाच्या कीबोर्डवर अशा अनेक कळ किंवा 'कीज' असतात, ज्यांच्या वापराने आपली कामे सोपी होतात; परंतु या सर्वांमध्ये एक अशी जोडी आहे जी केवळ काम सोपे करत नाही, तर वापरकर्त्याला मोठ्या संकटातून आणि मनस्तापातून वाचवते. ती जोडी म्हणजे 'कंट्रोल' आणि 'झेड' अर्थात 'Undo' कमांड. आजच्या डिजिटल युगात संगणकावर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही कळ एखाद्या तारणहारासारखी आहे. एखादी चूक झाली की भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण संगणकाच्या जगात या एका शॉर्टकटमुळे आपण ती चूक काही सेकंदात नाहीशी करून पुन्हा पूर्वस्थितीत येऊ शकतो.


जेव्हा आपण काही लिहित असतो, डिझाइन बनवत असतो किंवा महत्त्वाची आकडेमोड करत असतो, तेव्हा मानवी स्वभावामुळे चुका होणे अटळ असते. जुन्या काळी टाईपरायटरवर काम करताना एखादे अक्षर चुकले तर पूर्ण कागद बदलावा लागे किंवा व्हाईटनरचा वापर करावा लागे. मात्र, संगणकावर काम करताना 'कंट्रोल झेड' हे तंत्रज्ञान आपल्याला आपली चूक दुरुस्त करण्याची संधी देते. कीबोर्डवरील 'Ctrl' हे बटण दाबून धरून 'Z' हे अक्षर दाबले की आपण केलेली शेवटची कृती रद्द होते आणि आपण एक पाऊल मागे जातो. यालाच तांत्रिक भाषेत 'अनडू' (Undo) करणे असे म्हणतात.

या अप्रतिम शोधाचे श्रेय लॅरी टेस्लर या संगणक शास्त्रज्ञाला जाते. १९७० च्या दशकात झेरॉक्स पार्क या संशोधन केंद्रात काम करत असताना त्यांनी 'कट', 'कॉपी', 'पेस्ट' यांसारख्या कमांड्ससोबतच 'अनडू' या संकल्पनेचाही शोध लावला. त्या काळात संगणकावर काम करणे खूप क्लिष्ट होते आणि एखादी चूक झाल्यास पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागत असे. टेस्लर यांनी ही गरज ओळखली आणि वापरकर्त्यांना चुका सुधारण्याची संधी मिळावी यासाठी ही कमांड विकसित केली. पुढे ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये याचा समावेश केल्यामुळे आज हे बटण जगभरातील प्रत्येक संगणकाचा अविभाज्य भाग बनले आहे.

या कमांडची गंमत अशी आहे की ती केवळ शब्द पुसण्यापुरती मर्यादित नाही. जर तुम्ही चुकून एखादी फाईल डिलीट केली असेल, तर लगेच कंट्रोल झेड दाबल्यास ती फाईल परत येते. फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरमध्ये चित्र काढताना चुकीचा रंग भरला गेला किंवा रेष वाकडी झाली, तरी या कमांडमुळे चित्र पूर्ववत करता येते. थोडक्यात सांगायचे तर, संगणकाच्या मेमरीमध्ये आपण केलेल्या कृतींचा एक क्रम साठवलेला असतो. कंट्रोल झेड दाबल्यावर संगणक त्या क्रमातील शेवटची पायरी विसरतो आणि त्याआधीच्या पायरीवर आपल्याला नेऊन सोडतो.

अनेकदा असेही होते की आपण 'कंट्रोल झेड' दाबून एखादी गोष्ट पुसतो, पण नंतर लक्षात येते की ती गोष्ट बरोबरच होती. अशा वेळी घाबरण्याचे कारण नसते, कारण याला जोडूनच 'कंट्रोल वाय' (Ctrl+Y) म्हणजेच 'रिडू' (Redo) ही कमांड असते. याच्या मदतीने आपण पुसलेली गोष्ट पुन्हा परत आणू शकतो. म्हणजेच चुका सुधारणे आणि सुधारलेल्या चुका पुन्हा तपासणे, या दोन्ही गोष्टींचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते. यामुळे काम करताना एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि नवनवीन प्रयोग करण्याची भीती वाटत नाही.

या 'कंट्रोल झेड'चे तत्त्वज्ञान खूप खोल आहे. वास्तविक आयुष्यात आपण बोललेले शब्द किंवा केलेली कृती मागे घेऊ शकत नाही. एकदा बाण सुटला की तो परत येत नाही, असे आपण म्हणतो. त्यामुळेच खऱ्या आयुष्यात चुकांची किंमत मोजावी लागते. परंतु, डिजिटल जगात ही सुविधा असल्यामुळेच माणसे जास्त सर्जनशील होऊ शकली आहेत. कारण, इथे 'चूक झाली तर काय होईल?' ही भीती उरत नाही. आपण बिनधास्तपणे प्रयोग करू शकतो, कारण आपल्याला माहित असते की एक 'कंट्रोल झेड' आपल्या पाठीशी उभा आहे.

थोडक्यात सांगायचे तर, 'कंट्रोल झेड' हे केवळ कीबोर्डवरचे एक शॉर्टकट नसून, ते आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला दिलेले एक वरदान आहे. जोपर्यंत आपण संगणकावर काम करत आहोत, तोपर्यंत चुका करण्याची मुभा आपल्याला आहे आणि त्या चुकांमधूनच शिकत पुढे जाण्याची संधी ही छोटीशी कळ आपल्याला देत असते. त्यामुळेच संगणक साक्षरतेच्या धड्यात या कमांडला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

--- तुषार भ. कुटे

Sunday, January 25, 2026

क्रांतीज्योती आणि प्रमोशन

मराठी चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहीत, अशी अनेकांची बोंब असते. मराठी चित्रपट हे उत्तम असतातच. किमान ८० टक्के तरी! मग चित्रपटगृहामध्ये गल्ला जमवण्यासाठी ते कमी का पडतात? या प्रश्नाचे उत्तर कदाचित मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना माहीत असावे. परंतु तरीदेखील आपला चित्रपट चालावा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्यांनी पहावा यासाठी ते कष्ट घेत नाहीत.
सन २०२५ मध्ये जेवढे मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले त्या सर्वांची एकत्रित कमाई जवळपास ९८ ते ९९ कोटी रुपये होती. एवढी कमाई दक्षिणेतले अनेक चित्रपट सहज करत आलेले आहेत. मग मराठी चित्रपटांना हे साध्य का होत नसावे? मूलतः मराठी चित्रपट हे प्रमोशनसाठी कमी पडतात, हे निर्विवाद सत्य आहे. चित्रपट बनवला, नंतर वितरकांना दिला आणि थिएटरला लागला की लोक आपोआप आपला चित्रपट बघायला येतील, असे निर्मात्यांना वाटत असते. शिवाय अतिशय कमी बजेटमध्ये चित्रपट तयार झालेला असतो. त्यात चित्रपट महामंडळाचे अनुदान देखील असते. म्हणून थोडी का होईना लाखांमध्ये कमाई झाली तरी चित्रपटाचे पैसे वसूल होतात. कदाचित याच कारणास्तव चित्रपटाचे प्रमोशन करण्यास निर्माते, दिग्दर्शक कमी पडत असावेत. ही निर्मात्यांची मानसिकताच तयार झाली आहे, असं दिसतं. याउलट अन्य भाषेतील चित्रपट त्यांच्या प्रदेशामध्ये तसेच दूरचित्रवाणीद्वारे, रेडिओद्वारे आणि भेटीगाठी व कार्यक्रमांद्वारे देखील चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करतात. ही गोष्ट मराठी चित्रपटांच्या बाबतीत अगदीच नगण्य आहे.
सध्या मराठी चित्रसृष्टीमध्ये कमाईचे कोटीच्या कोटी आकडे पार करणारा चित्रपट म्हणजे "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" होय. या चित्रपटाचा विषय उत्तम आहेच. मांडणी देखील छान आहे. विषय तर अप्रतिमच आहे. परंतु चित्रपटाच्या चमुने तो प्रदर्शित झाल्यानंतर ज्या वेगाने, सातत्याने, वैविध्याने त्याचे प्रमोशन केले आहे, त्यामुळेच अजूनही चित्रपटगृहात गर्दी खेचताना दिसतो. आज त्याची कमाई २० कोटीच्या वर गेलेली आहे. ती का? तर यामागे दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षिति जोग आणि चित्रपटातील अन्य कलाकारांनी त्याच्या प्रमोशनवर घेतलेले कष्टच कारणीभूत आहेत. अनेकदा निर्माते आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केवळ मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागातच करतात. कारण या बाहेरील शहरांमध्ये त्यांना हव्या त्या सुविधा कदाचित मिळत नसाव्यात. किंबहुना मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांविषयी अनुत्सुक असावेत. पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याशिवाय त्यांना आपला चित्रपट समजणार कसा? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधायला हवे. 'क्रांतीज्योती'च्या पूर्ण संघाने महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जाऊन चित्रपटगृहांमध्ये पोहोचून त्याचे प्रमोशन केले. शिवाय चित्रपटाच्या विषयाशी निगडित असणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना, रिलस्टार्सना आणि समाज माध्यमांवर लोकप्रिय असणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांनी सोबत घेतले होते. त्या सर्वांच्या समाजमाध्यमांवरील पानांवर चित्रपटाचे प्रमोशन झाले. सातत्याने या चित्रपटातील कलाकार त्यांच्या समाजमाध्यमांवरील अकाउंटवर विविध पोस्ट करत होते. लोकप्रिय गाण्यांवरती रिल्स तयार होत होते. म्हणूनच चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आणि अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचत आहे.
मागच्या वर्षी सर्व मराठी चित्रपटांनी केवळ ९८ कोटी कमावले होते तर यावर्षी पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाल्याने चित्रपटाने २० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी एक धडा आहे आणि शिकवण देखील. केवळ 'माऊथ पब्लिसिटी'च्या जोरावर सर्वच चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्या चित्रपट हे उत्तम असतातच. परंतु ते बनवून आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करून फायदा नाही. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. त्यासाठी प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतरही प्रमोशनच्या विविध क्लुप्त्या त्यांना निश्चितच वापराव्या लागतील. लोकांना दिग्दर्शक आणि कलाकार माहीत झाल्यानंतर पुढील चित्रपटाची ते निश्चितच प्रतीक्षा करतील. हे समजून घेतले पाहिजे. बाकी मराठी चित्रपटसृष्टी गुणवत्तेच्या बाबतीत कोणाच्याही मागे नाही. फक्त आपल्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे वाटते.

--- तुषार भ. कुटे 

 


Friday, January 23, 2026

कॅप्चा: इंटरनेटच्या विश्वातील आपला विश्वासू डिजिटल पहारेकरी

आपण जेव्हाही इंटरनेटवर एखादा फॉर्म भरतो, नवीन खाते उघडतो किंवा ऑनलाईन तिकीट काढायला जातो, तेव्हा आपल्याला एक छोटीशी पण विचित्र अडचण हमखास येते. आपल्याला काही वाकडीतिकडी अक्षरे ओळखायला सांगितली जातात किंवा 'ट्रॅफिक सिग्नल' कुठे आहेत हे चित्रात शोधायला लावले जाते. कधीकधी तर फक्त "मी रोबोट नाही" (I am not a robot) अशा चौकटीवर क्लिक करायला सांगितले जाते. यालाच तांत्रिक भाषेत "कॅप्चा" (CAPTCHA) असे म्हणतात. हे पाहिल्यावर आपल्याला कधीकधी वैताग येतो, पण इंटरनेटच्या सुरक्षिततेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
कॅप्चा म्हणजे नक्की काय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला इंटरनेटवर घडणाऱ्या एका मोठ्या समस्येकडे बघावे लागेल. इंटरनेटवर जसे सामान्य माणसे माहिती शोधतात, तसेच काही स्वयंचलित प्रोग्रॅम देखील फिरत असतात, ज्यांना आपण 'बॉट' (Bot) असे म्हणतो. हे बॉट्स माणसापेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम करू शकतात. जर एखाद्या हॅकरने असा बॉट बनवला की जो एका सेकंदात हजारो बनावट ईमेल आयडी तयार करेल किंवा एखाद्या वेबसाईटवर हजारो स्पॅम कमेंट्स करेल, तर ती वेबसाईट क्रॅश होऊ शकते किंवा तिचा गैरवापर होऊ शकतो. हे रोखण्यासाठी, समोर संगणक वापरणारा "माणूस" आहे की "बॉट", हे ओळखणे गरजेचे झाले. यासाठी जी चाचणी तयार करण्यात आली, तिलाच 'कॅप्चा' म्हणतात. कॅप्चाचा फुल फॉर्म आहे - "Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart." सोप्या भाषेत सांगायचे तर, ही संगणक आणि माणूस यांच्यातील फरक ओळखणारी एक चाचणी आहे.


कॅप्चाचा इतिहास अतिशय रंजक आहे. याची सुरुवात साधारणपणे २००० च्या दशकात झाली. त्याकाळी 'याहू' ही जगातील सर्वात मोठी ईमेल सेवा होती. त्यांना एक मोठी समस्या भेडसावत होती. हॅकर्सनी बनवलेले स्वयंचलित प्रोग्रॅम (बॉट्स) याहूवर हजारो बनावट ईमेल खाती उघडत होते आणि त्याद्वारे स्पॅम पसरवत होते. यावर उपाय शोधण्यासाठी कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीचे लुईस फोन अहन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक युक्ती शोधली. त्यांनी पाहिले की, संगणकाला सरळ छापलेली अक्षरे वाचता येतात, पण जर तीच अक्षरे वाकडीतिकडी केली, त्यावर काही रेषा मारल्या किंवा पार्श्वभूमी बदलली, तर संगणकाला ती ओळखता येत नाहीत. मात्र, मानवी मेंदू ती सहज ओळखू शकतो. या तत्त्वाचा वापर करून त्यांनी पहिला कॅप्चा तयार केला. यामध्ये वापरकर्त्याला वाकडीतिकडी अक्षरे टाईप करायला लावली जात असत. यामुळे बॉट्सना रोखण्यात मोठे यश मिळाले.

पण गोष्ट इथेच थांबली नाही. या संशोधकांनी विचार केला की, कोट्यवधी लोक रोज कॅप्चा सोडवण्यासाठी काही सेकंद खर्च करतात. या वेळेचा काही चांगला उपयोग होऊ शकतो का? या विचारातून 'री-कॅप्चा' (reCAPTCHA) चा जन्म झाला. आपण पाहिले असेल की, जुन्या काळात कॅप्चामध्ये दोन शब्द यायचे. त्यातील एक शब्द संगणकाला माहित असायचा, पण दुसरा शब्द हा जुन्या स्कॅन केलेल्या पुस्तकांमधील असायचा जो संगणकाला वाचता येत नव्हता. जेव्हा लाखो लोक तो दुसरा शब्द एकाच प्रकारे टाईप करायचे, तेव्हा गुगलला खात्री पटायची की हा शब्द काय आहे. अशा प्रकारे, आपण कॅप्चा सोडवताना कळत-नकळत जुनी पुस्तके आणि वर्तमानपत्रे डिजिटाईज करायला मदत करत होतो. न्यूयॉर्क टाइम्सची अनेक जुनी कागदपत्रे याच पद्धतीने डिजिटल स्वरूपात जतन केली गेली आहेत.

कालांतराने तंत्रज्ञान प्रगत झाले आणि बॉट्स देखील हुशार झाले. 'ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन' (OCR) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संगणक सुद्धा वाकडीतिकडी अक्षरे वाचायला शिकले. त्यामुळे अक्षरांच्या कॅप्चाचा प्रभाव कमी होऊ लागला. मग गुगलने चित्रांचा वापर सुरू केला. यामध्ये आपल्याला "चित्रातील कार ओळखा", "बस ओळखा" किंवा "क्रॉसवाक ओळखा" असे प्रश्न विचारले जाऊ लागले. हे बॉट्ससाठी खूप कठीण होते कारण चित्रातील वस्तू ओळखणे हे मानवी मेंदूचे खास कौशल्य आहे. विशेष म्हणजे, याद्वारे आपण गुगलच्या ड्रायव्हरलेस कारला रस्ते आणि वस्तू ओळखण्याचे प्रशिक्षण देत होतो.

आजच्या काळात कॅप्चा आणखी सोपा आणि प्रगत झाला आहे. आता आपल्याला फक्त एका चेकबॉक्सवर क्लिक करावे लागते, ज्यावर लिहिलेले असते "मी रोबोट नाही". याला "नो कॅप्चा री-कॅप्चा" (No CAPTCHA reCAPTCHA) म्हणतात. हे वरकरणी सोपे वाटत असले तरी, यामागे खूप मोठे तंत्रज्ञान आहे. जेव्हा आपण माउस कर्सर त्या चेकबॉक्सकडे नेतो, तेव्हा आपली माउस हलवण्याची पद्धत गुगल तपासते. माणूस माउस हलवताना थोडा वेडावाकडा किंवा अनियंत्रित असतो, तर बॉट एकदम सरळ रेषेत आणि अचूक जातो. या सूक्ष्म हालचालींवरून आणि आपल्या ब्राऊझिंग हिस्टरीवरून गुगल ओळखते की आपण माणूस आहोत. जर गुगलला थोडी जरी शंका आली, तरच ते आपल्याला पुन्हा चित्रे ओळखायला सांगते.

सध्या तर 'इन्व्हिजिबल कॅप्चा' (Invisible CAPTCHA) नावाचे तंत्रज्ञान येत आहे, जिथे आपल्याला काहीच करावे लागत नाही. हे तंत्रज्ञान पार्श्वभूमीमध्ये राहूनच वापरकर्त्याच्या वागण्यावरून ठरवते की तो माणूस आहे की बॉट.

कॅप्चाचा आजचा उपयोग फक्त ईमेल खाते उघडण्यापुरता मर्यादित नाही. ऑनलाईन बँकिंगमध्ये व्यवहार सुरक्षित करण्यासाठी, ऑनलाईन पोलमध्ये एकाच व्यक्तीने वारंवार मते देऊ नयेत म्हणून, ब्लॉगवर स्पॅम कमेंट्स रोखण्यासाठी आणि तिकीट बुकिंगच्या वेळी काळाबाजार करणाऱ्या सॉफ्टवेअरना रोखण्यासाठी कॅप्चा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जोपर्यंत इंटरनेटवर हॅकर्स आणि स्पॅम बॉट्स आहेत, तोपर्यंत कॅप्चासारख्या सुरक्षा रक्षकाची आपल्याला गरज भासणार आहे. हे एक सतत चालणारे युद्ध आहे, जिथे बॉट्स हुशार होत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी कॅप्चा देखील अधिक स्मार्ट होत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कॅप्चा सोडवावा लागेल, तेव्हा लक्षात ठेवा की ती केवळ एक अडचण नसून, तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी उभी केलेली एक मजबूत भिंत आहे.
(आधारित)

-- तुषार भ. कुटे.

पुणे ग्रँड टूर २०२६

पुणे ग्रँड टूर २०२६ ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह आजूबाजूच्या अनेक तालुक्यांमधून या स्पर्धेचा मार्ग होता. यावर्षी पहिल्यांदाच पुण्यामध्ये ही शहर ही स्पर्धा आयोजित केली असल्यामुळे पुणेकरांचा उत्साह काही वेगळाच होता. समाजमाध्यमांवरील अनेक पोस्टद्वारे ही स्पर्धा बहुतांश लोकांपर्यंत पोहोचली. शिवाय ज्या मार्गाने सायकलपटू जात होते त्याच्या दोन्ही बाजूंना ही स्पर्धा पाण्यासाठी तसेच सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुणेकरांची बरीच मोठी गर्दी पाहायला मिळाली. अगदी ग्रामीण भागामध्ये देखील नागरिकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
मलासुद्धा काही सेकंद का होईना हा अनुभव घेता आला. आज अखेरच्या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर केवळ दहाच मिनिटांमध्ये सायकलपटुंचा जत्था पाषाण रोडवरून पुणे विद्यापीठाच्या दिशेने गेला. यावेळी नेहमीच ओस पडलेल्या भागावर देखील मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करून होते. सायकलपटूंना प्रोत्साहन देत होते. आणि विशेष म्हणजे या एकंदरीत क्रीडासणाचा आनंद देखील घेत होते. एका अर्थाने आपल्या शहरातील नागरिक सुजाण आहेत अशी प्रतिमा परदेशी सायकलपटूंसमोर तयार झाली असावी, यात वाद नाही. 
जेव्हा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा शहरांमध्ये होतात त्यावेळेस त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. सायकलिंग हा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही. परंतु त्याला कोणी फारसे गांभीर्याने देखील घेत नाही. या निमित्ताने का होईना सर्वसामान्य नागरिकांना या क्रीडा प्रकारातले वेगळेपण निश्चितच दिसून आले असावे. शिवाय क्रीडापटूंची मेहनत, कणखरता, सातत्य यांचा देखील अनुमान आला असावा, अशी आशा वाटते.

--- तुषार भ. कुटे


 

आजि मी स्वच्छ शहरे पाहिली!

आज पुणे ग्रँड टूर स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि पुण्यातले रस्ते बंद करण्याचा पण.... याचं वेळापत्रक कालच आलं होतं. सकाळी नऊ वाजल्यापासूनच पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले बरेचसे रस्ते बंद होणार होते. त्यामुळे जोखीम नको म्हणून सकाळी साडेसात वाजताच बाईक घेऊन मार्गस्थ झालो.
मागच्या काही दिवसांपासून या स्पर्धेच्या तयारीची क्षणचित्रे शहरांमधल्या रस्त्यांवरून अनुभवत होतो. आज ती पूर्णतः पाहायला मिळाली. देहू-आळंदी रस्ता पार करून स्पाईन रोडला लागलो. गेली कित्येक वर्षांपासून पहिल्यांदाच हा रस्ता छान नटलेला दिसत होता. रस्त्यावर कुठेही घाण नाही. अगदी रस्त्यांच्या झाडांचा पालापाचोळा देखील पडलेला नव्हता. सकाळी सकाळीच स्वच्छता कर्मचारी तो साफ करत होते. थोड्याच वेळात भोसरी एमआयडीसी मधून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागलो. एमआयडीसीतल्या कंपन्यांमधून येणाऱ्या धुराचा आणि केमिकलचा वास घेत टाटा मोटर्सच्या रस्त्यावर पोहोचलो. आज या रस्त्यावर गाडी चालवण्याची अनुभूती काहीतरी वेगळीच होती. काळे कुळकळीत आणि सपाट गुळगुळीत रस्त्यांवरून सुसाट वेगाने गाडी चालवू लागलो. दुभाजक चक्क पाण्याने धुऊन काढलेले होते! त्यांच्यावर काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे देखील मारले होते. मागच्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाणी पिऊन दुभाजकावर लावलेली झाडे सुंदर टवटवीत दिसू लागली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सफाई कर्मचारी अजूनही कचरा झाडून घेत होते. कुठेही कोणत्या प्रकारचे अतिक्रमण नाही. सकाळी सकाळी पादचारी देखील पदपथाचा अर्थात फुटपाथचा वापर करत होते. रोज रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या गाड्या आज तिथे पार्क केलेल्या नव्हत्या. रस्त्याकडेच्या बांधकाम विभागाच्या सर्व फलकांवर पुणे ग्रँड टूरचा शुभंकर आणि बोधचिन्ह लावलेले होते. रस्ता इतका गुळगुळीत की सायकल स्वाराच्या बाटलीतील पाणीदेखील हलणार नाही. इतके दिवस सायकल चालवतोय पण अशा रस्त्यांवर सायकल चालवण्याची संधी कधीच मिळाली नाही, याची मात्र वाईट वाटले.
झोपडपट्टीची वस्ती असलेल्या ठिकाणी पूर्ण रस्त्याला पांढरे कापड लावलेले होते. गरिबी मिटवण्याऐवजी ती झाकण्यास सोपे असते, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. थोड्याच वेळात पुन्हा एमआयडीसीमध्ये घुसलो आणि रस्त्यांची श्रीमंती गरिबीमध्ये बदलून गेली. पुणे-नाशिक महामार्गावर तीच वर्दळ चालू होती. इथला कचरा तसाच होता. पालापाचोळा कित्येक दिवसांपासून तसाच रस्त्याच्या कडेला पडलेला होता. आजूबाजूची वाहनेच त्याची हालचाल करवत होती.
नाशिक फाट्यावरून दापोडी आणि पुढे नदी ओलांडून बोपोडीच्या पुलाखालून पुणे विद्यापीठाच्या दिशेला लागलो. नदीच्या काठावर इथे येणारी दुर्गंधी तशीच होती. कदाचित सायकलस्वारांची वारी या रस्त्याने जात नसावी, हे समजले. अनाधिकृत फलकमुक्त झालेल्या पिंपरी-चिंचवड मधून पुणे मनपा हद्दीमध्ये पोचल्यावर नवनियुक्त नगरसेवकांच्या अभिनंदनचे भलेमोठे फलक पुन्हा दृष्टीस पडले. कदाचित हा देखील सायकल स्वारीचा मार्ग नव्हता. मग स्पायसर चौक, ब्रेमेन चौक करत पुणे विद्यापीठ रस्त्याला लागलो. आणि पुणे महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांची लगबग दिसायला लागली. आजूबाजूच्या भिंती छानपणे रंगवलेल्या त्यावर पुन्हा बोधचिन्ह आणि शुभंकर...! रस्त्यावर रोज मुक्तपणे संचार करणारी आणि एकमेकांवर सतत कुरघोडी करत भुंकणारी भटकी कुत्री आज एका कोपऱ्यामध्ये घोळका करून उत्सुकतेने पाहत होती. आज त्यांना कदाचित मारून मुटकून एका जागेवर बसवले असावे! आज कोणता सण आहे की काय? याची उत्सुकता त्यांच्या डोळ्यात देखील दिसत होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रस्ते देखील तसेच काळे कुळकुळीत आणि सपाट गुळगुळीत....
पाषाण रोडवर रस्त्याला मारलेले पांढरे पट्टे अतिशय उठून दिसत होते. आज पहिल्यांदाच लक्षात आले की हा रस्ता तब्बल चार पदरी आहे! इथल्या ही दोन्ही बाजूंना भिंतीवर रंगवलेले शुभंकर आणि बोधचिन्ह पुन्हा मिरवत होते. मागच्या बऱ्याच वर्षांपासून पाहत आलेले फळविक्रेते त्यांच्या अतिक्रमण केलेल्या फुटपाथवर दोन दिवसांपासून नव्हते. ती जागा अतिशय स्वच्छ आणि रंगवलेली दिसली....
इच्छितस्थळी पोहोचलो तेव्हा या सर्वांचा विचार केला. आपल्याकडच्या प्रशासन प्रणाली सर्वकाही करू शकतात. शहरे स्वच्छ ठेवता येतात. अतिक्रमण मुक्त करता येतात. सर्वकाही शिस्तबद्ध चालवता येऊ शकतं. शहरी जीवनमान वाहतूक सुसह्य करता येऊ शकते. पण प्रशासन ते करत नाही. जेव्हा गरज असेलच तेव्हाच ही यंत्रणा पूर्ण शक्तीनिशी कार्यरत होते. एकदा सर्वकाही संपलं की पुन्हा जैसे थे!

--- तुषार भ. कुटे



Thursday, January 22, 2026

रा. श्री. मोरवंचीकर

पांडवलेणी मधील भिंतींवर कोरलेली ती गूढ अक्षरे नक्की काय आहेत? याची माहिती मला वीस वर्षांपूर्वी नव्हती. जुन्या काळातली कुठलीशी लिपी आहे आणि लेण्यांविषयी माहिती त्यामध्ये लिहिलेली असावी, असं मला वाटायचं. या लेण्या पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात बनवल्या होत्या, असे बरेच गैरसमज पसरलेले होते. परंतु कालांतराने या लेण्यांच्या इतिहासाची हळूहळू माहिती होत गेली. सातवाहन काळाचा इतिहास वाचून काढला. त्याकरिता डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांचं बऱ्याच वर्षांपूर्वी घेतलेलं "सातवाहनकालीन महाराष्ट्र" हे पुस्तक उपयोगात आलं. २००० वर्षांपूर्वी महाराष्ट्र देशावर राज्य करणारे सातवाहन राजे नक्की कोण होते? त्यांची राज्यपद्धती कशी होती? तसेच त्यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक कशी घडवली? अशा विविध प्रश्नांची उकल सर्वप्रथम या पुस्तकामुळे मला झाली. कालांतराने सातवाहनांशी संबंधित अनेक पुस्तकांचे वाचन केले. यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची माहिती झाली. 
सुदैवाने माझा जन्म जुन्नरचा. जुन्नरच्या परिसरामध्ये सातवाहनांच्या अगणित पाऊलखुणा आजही दिसून येतात. अनेक लेण्या, किल्ले आणि शिलालेख या परिसरामध्ये आहेत. तिथे वावरताना सातवाहन काळाच्या इतिहासाची सखोल ओळख करून घेता आली. शिवाय यामधून प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे विविध कंगोरे देखील ध्यानात आले.
हा प्राचीन इतिहास आपल्यासमोर आणण्यासाठी काही मोजक्या इतिहास संशोधकांनी अथक प्रयत्न केले. त्यातीलच एक रा. श्री. मोरवंचीकर होय. त्यांच्या सातवाहनकालीन महाराष्ट्र या पुस्तकामुळे ते माझ्या नेहमीच लक्षात राहिले. दोन दिवसांपूर्वी त्यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. इतिहासविश्वाने याची दखल घेतली की नाही हे माहित नाही. परंतु महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास देशासमोर आणण्याचे त्यांचे महान कार्य इथून पुढे तरी मराठी लोक लक्षात ठेवतील, अशी आशा वाटते.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-- तुषार भ. कुटे


 

Wednesday, January 21, 2026

प्रिय हेमंत ढोमे

प्रिय हेमंत ढोमे,

तुझा "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" हा चित्रपट पाहिला.... नाही आवडला... 

कारण या चित्रपटामध्ये तू खूप सार्‍या चुका केलेल्या आहेत... 

तुला माहीत नाही का आम्ही मराठी लोक फक्त आडनावाने मराठी आहोत.... आम्हाला आमच्या भाषेशी काही घेणेदेणे नाही... आम्हाला ज्ञान नको आहे... आम्हाला फक्त चकचकीत गुळगुळीत दिसणाऱ्या आणि भरमसाठ सुविधा देणाऱ्या इंग्रजी शाळा हव्या आहेत... तू हे काही दाखवलं का?.... नाही ना.... मग तू चुकलास!

आम्ही जरी मराठी शाळेतून शिकलो असलो तरी आज विविध कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ ठिकाणी काम करतो आहे. आम्हाला मराठीतून शिकल्याची लाज वाटते. म्हणूनच आमच्या मुलांना देखील आम्ही मराठी शाळेमध्ये शिकवत नाही.... आमच्यासाठी इंग्रजी म्हणजेच सर्वकाही... तू हे काही दाखवलं का?.... नाही ना.... मग तू चुकलास!

मातृभाषेतून शिक्षण म्हणजे आपुलकीचं आणि हसत खेळत शिक्षण... मीही असेच शिकलो... अनेकदा शिकत गेलो... अनुभव संपन्न झालो.... आमच्या भाषेतील शिक्षणातून आमचं व्यक्तिमत्व घडवलं.... पण आम्हाला आमच्या मुलांना यातलं काहीच द्यायचं नाहीये..... त्यांच्यामध्ये कृत्रिमता आणायची आहे.... त्यांच्याकडून सर्व काही रट्टा मारून, घोकून, पाठ करून घ्यायचं आहे... आणि काही वर्षानंतर त्याला खोऱ्याने पैसा ओढताना पाहायचं आहे.... हेही तू दाखवलं नाहीस... म्हणजे तू चुकलासच!

आम्हाला आमच्या शिक्षकांनी आत्मीयतेने शिकवलं. अवघड गोष्टी सहज आणि सोप्या करून दाखवल्या. आजही त्या आमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसलेल्या आहेत. पाढ्यांचा तर विषयच नाही... 'पाचा साते किती?' असं कोणी विचारलं तर लगेचच ३५ हे उत्तर येतं.... पण याचा वास्तविक जीवनात काही उपयोग आहे का?... नाही... आमच्या मुलांना आम्हाला हे सर्व काही द्यायचं नाहीये... त्यांच्या शिक्षकांनी शिकवावं आणि निघून जावं.... आमच्या मुलाचं नाव त्याने लक्षात ठेवलं नाही तरी चालेल... काय चाटायची आहे ती आत्मीयता?.... हेही तू दाखवले नाहीस.... ही पुढची चूक.... 

आमच्याकडे आहे भरपूर पैसा... आम्हाला तो उधळायचा आहे..  इंटरनॅशनल, युनिव्हर्सल आणि ग्लोबल स्कूलच्या नावाखाली... उद्या आमच्या मुलाने आम्हाला विचारायला नको की तुम्ही माझ्या शिक्षणावर खर्च का नाही केला?... म्हणून करतो आम्ही खर्च... म्हणून आम्हाला हव्या असतात इंटरनॅशनल शाळा आणि त्यातल्या एसीवाल्या क्लासरूम... हे सुद्धा तुझ्या चित्रपटात नाही... म्हणजे तू परत चुकला... 

मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल... असं तू म्हणतोस.... 
काय करायचं आहे भाषा टिकून? मेली तर मेली.... फार फार तर काय होईल? मराठी संस्कृती नष्ट होईल.... महाराष्ट्राची ओळख नष्ट होईल.... आम्हाला काय त्याचं? आम्ही कणा नसलेली आणि मराठी आडनावे घेऊन मिरवणारी माणसं आहोत....

- तुझा चित्रपट न आवडलेला एक मराठी प्रेक्षक 

(तुषार भ. कुटे यांच्या लेखणीतून)


पैसावाटप

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे इतर स्थानिक पातळीवरील निवडणुका फारशा गाजत नाहीत किंवा त्यांना ग्लॅमरही तितके प्राप्त होत नाही. परंतु यावेळेसच्या महानगरपालिका निवडणुका इतर वेळेपेक्षा वेगळ्या भासल्या. मागच्या पाच-सहा वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललेल्या घडामोडींचा प्रभाव या निवडणुकांवरती होणार होता. आणि तो झालाही. राजकारणामध्ये होणारी पैशाची भली मोठी उलाढाल पाहता सर्वच राजकीय पक्षांमध्ये तसेच पक्षाच्या उमेदवारांमध्ये सत्ताकारणात सहभागी होण्याची अतिव आकांक्षा दिसून आली. एकंदर पक्षनिष्ठा किंवा समाजकारण नावाच्या गोष्टी आता राजकारणातून लुप्त होत जाताना दिसत आहेत. 
निवडणुकांमध्ये दरवेळेसच पैसावाटप बेसुमारपणे होत असते. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही अशा बऱ्याच चर्चा मी आजूबाजूला ऐकल्या. त्या खऱ्याही असाव्यात. आजही लोकशाहीतील मतदाराला आपले मत किती महत्त्वाचे आहे, याविषयी काहीही पडलेले नाही. निवडणुका आल्या की बरेच लोक जोपर्यंत एखाद्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराकडून पैसे येत नाही तोपर्यंत मतदानालाही जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. समाजव्यवस्थेतील शेवटच्या स्तरावरील जनता तसेच झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक अनेकदा अशा पद्धतीने पैसे घेऊन मतदान करताना ऐकलेले आहे. कोणत्या भागामध्ये पैसे वाटले की मते मिळतात, याची इत्यंभूत माहिती राजकारण्यांच्या कार्यकर्त्यांना असते. यावेळेसही पैसे वाटप होणार हे माहीत होते. परंतु यंदाच्या निवडणुकांमध्ये मी बरेच असेही लोक पाहिले की जे मोठमोठ्या सोसायटीमध्ये राहतात, त्यांनी देखील विविध पक्षांच्या उमेदवाराकडून तब्बल दहा-दहा हजार रुपये घेऊन मतदान केले होते. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या आणि महानगरपालिकेमध्ये मतदानाचा अधिकार असणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडूनच कोणता उमेदवार किती पैसे देत आहे? याची माहिती मिळाली होती. अनेक उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकांनी देखील पैसे घेऊन मतदान केल्याचे ऐकिवात आले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. मागच्या पाच-सहा वर्षातील राजकारणाचा खेळखंडोबा पाहता, कुणीही आले तरी काहीही फरक पडत नाही, आपल्याला पैसे मिळणे महत्त्वाचे. अशा मानसिकतेतूनच सर्वच लोक उमेदवाराकडून पैसे घेऊन त्यांना मतदान करताना यंदा पहिल्यांदाच दिसून आले. हा भयानक पायंडा पडायला २०२६ ची महानगरपालिका निवडणूक कारणीभूत ठरताना दिसली. लोकशाही सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तेच लोक तिला पायदळी तुडवताना दिसले. हा भारतासारख्या मोठ्या लोकशाहीचा पराभवच आहे. 

--- तुषार भ. कुटे


 

Tuesday, January 20, 2026

परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष - हृषिकेश गुप्ते

मराठी चित्रपटांसाठी जसे ए-सर्टिफिकेट असते तसं जर पुस्तकांना दिलं तर त्यामध्ये काही पुस्तकांचा समावेश करता येईल. त्यातीलच हृषिकेश गुप्ते लिखित "परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष" हा दोन दीर्घ कथांचा संग्रह. 
या दीर्घ कथासंग्रहातील पहिली कथा अर्थात शीर्षक कथा आहे. वेगळ्या ढंगाने लिहिलेली. मला तिच्यामध्ये पाश्चिमात्य लेखकांच्या शैलीचा प्रभाव जाणवला. यामधील पात्रांना सातत्याने त्यांच्या कामावरून आणि विशेषणाने संबोधले आहे. जसे की सतत पत्त्यांचे बंगले बांधणारे घारे गोरे मॅनेजर साहेब, सतत प्रवास करणारा शाई एजंट, सतत पतंग उडवणारा फोल्डिंगचा पुरुष, सतत रेडिओ ऐकणारा अल्लाबक्ष चहावाला, सतत काम करणारा तुकाराम बाईंडर, सतत लोकांच्या भेटीगाठी घडवून आणणारे सर. हे वाचायला थोडं विचित्र आणि मनोरंजक वाटतं. पण ही शैली भन्नाट आहे. परफेक्टच्या बाईने तिच्या दुसऱ्या विवाहासाठी रचलेले स्वयंवर आणि त्या स्वयंवरासाठी घातलेली विचित्र अट तसेच या अटीची पूर्तता करणारे महाविचित्र लोक... असे सर्वच विचित्र-विचित्र आहे!
अखेरीज या स्वयंवरामध्ये एकाचा विजय होतो. अर्थातच हा शेवट अनपेक्षित आहे. तो असा का झाला? या प्रश्नाचे उत्तर देखील लेखकाने स्पष्टीकरणासह दिले आहे.
कथासंग्रहातील दुसरी कथा म्हणजे "तिळा दार उघड..." ही गोष्ट आहे तिलक नावाच्या एका मुलाची आणि युवकाचीही. त्याच्या तिलक नावामागे छानसा आणि मजेशीर इतिहास आहे. हाच धागा पकडून संपूर्ण कथा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहते. तिलकला लाभलेलं दैवी वरदान त्याच्या आजूबाजूच्या सर्वांना समजत असतं. त्याचा तो गैरफायदा घेतो. परंतु एका अर्थाने त्याने स्वतःलाच फसवलेले असते. यातून तो कसा मार्ग काढतो? तसेच त्याच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या घटना घडत राहतात? अशा विविध प्रश्नांची उत्तरे कथेच्या अखेरीस आपल्याला मिळतातच. दोन्ही कथा वेगाने सरकणाऱ्या...  याच कारणास्तव एकदा सुरुवात केली की शेवट करूनच पुस्तक खाली ठेवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आहेत.

--- तुषार भ. कुटे 



Monday, January 19, 2026

तंत्रज्ञान आणि अनुवाद

"प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या माझ्या नव्या पुस्तकाची समाजमाध्यमावर पोस्ट केल्यानंतर काही दिवसांमध्ये एका वाचकाचा मला मेसेज आला. 'सर तुम्ही कोणत्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करून हे पुस्तक लिहिले आहे?' अर्थातच हा प्रश्न काही आश्चर्यकारक नव्हता. यापूर्वी देखील 'पायथॉन प्रोग्रामिंग'च्या वेळेस दोन जणांनी मला असा प्रश्न विचारला होता. 
मूलतः भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञानाचे ज्ञान तयार होत नाही किंवा लिहिले जात नाही, हा भारतीय लोकांचा गैरसमजच. संगणक तंत्रज्ञानाचा उदयच पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. मुख्यत्वे इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये म्हणजेच अमेरिका आणि इंग्लंडसारख्या राष्ट्रांमधील संगणक विकसकांनी या तंत्रज्ञानाला गती दिली. त्यामुळे त्यांचे ज्ञान हे त्यांच्याच इंग्रजी भाषेमध्ये लिहिले गेले. परंतु युरोपियन देशांनी मात्र इंग्रजीतील हे ज्ञान स्वतःच्या भाषेमध्ये लिहिले. आजही त्यांची जवळपास सर्वच पुस्तके स्थानिक भाषेमध्ये लिहिलेली असतात. अनेक शतकांपूर्वी आपल्या देशामध्ये संस्कृत भाषेविषयी जी परिस्थिती होती तीच आज इंग्रजीच्या बाबतीत आहे. त्या काळात ज्ञान फक्त संस्कृत भाषेमध्येच लिहिले गेले होते. परंतु कालांतराने अनेक विभूतींनी प्रयत्नपूर्वक सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये लिहून त्यांना समाजज्ञानाची ओळख करून दिली. 
भारतामध्ये मात्र संगणक तंत्रज्ञानाची ओळख व्हायला काही दशके जावी लागली. या तंत्रज्ञानाची आपल्याला बऱ्याच उशिरा आणि संथपणे ओळख झाली. इथल्या विकसकांनी इंग्रजी भाषा आत्मसात करून, पाश्चिमात्य पुस्तकांचा अभ्यास करून संगणक क्षेत्रामध्ये शिरकाव केला. मागच्या शतकामध्ये तंत्रज्ञानाची माहिती आपल्या भाषांमध्ये आणण्यासाठी कुणी प्रयत्न केल्याचे मला आठवत नाही. परंतु मागच्या दहा-पंधरा वर्षांपासून हळूहळू संगणक ज्ञान आपल्या भाषांमध्ये तयार होत आहे. या क्षेत्रामध्ये अनुवादित पुस्तके जवळपास नाहीतच. पाश्चिमात्य लेखकांनी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके अनुवादित होऊन भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झालेली आहेत. परंतु तंत्रज्ञान क्षेत्राची अशी परिस्थिती नाही. भारतीय भाषांमध्ये पुस्तके नगण्य असली तरी ती बहुतांश इथल्याच लेखकांनी लिहिलेली आहेत. अर्थात मी देखील माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून 'पायथॉन प्रोग्रामिंग', 'डेटा सायन्स' आणि 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' अशी आजच्या युगातील तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह आपल्या भाषेमध्ये लिहिली. खरं सांगायचं तर हे तंत्रज्ञान शिकताना मी अनेक पुस्तकांचा वापर केला होता. परंतु मराठीतून पुस्तक लिहिताना केवळ अनुभवाचाच वापर झाला. यासाठी कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचा संदर्भ घेतला नव्हता. वाचकांच्या दृष्टिकोनातून शिकण्याचा प्रवाह कसा असावा? कोणत्या प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव या पुस्तकांमध्ये असावा? तसेच एखादी संकल्पना आपल्या भाषेमध्ये कशा पद्धतीने सहज व सोपी करून सांगता येईल? अशा विविध प्रश्नांचा विचार करूनच मी पुस्तकांची रचना केली आहे. यावर्षी रोबोटिक्स, संगणकायन, प्रॅक्टिकल मशीन लर्निंग, प्रॅक्टिकल न्यूरल नेटवर्क, प्रॅक्टिकल कॉम्प्युटर व्हिजन, प्रॅक्टिकल नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, प्रॅक्टिकल जनरेटिव्ह एआय, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, एआय आणि क्रिएटिव्हिटी, एआय आणि गूढ प्रश्नांची उकल, ड्रॅगनच्या विळख्यात एआय आणि मशीनचे मन अशी विविध पुस्तके मराठी भाषेतून प्रसिद्ध करण्याचा माझा मानस आहे. अर्थात केवळ इंग्रजीत वाचकांना असणारे ज्ञान सर्वसामान्य मराठी जनापर्यंत पोहोचावे, या एकमेव उद्देशाने या पुस्तकांचे लिखाण चालू आहे. हळूहळू एकेक पुस्तक मराठी वाचकांपर्यंत पोहोचेल. त्यांनाही यातून तंत्रज्ञानाची सखोल ओळख होईल, असा मला दृढ विश्वास आहे. 

--- तुषार भ. कुटे

 


 

 

Sunday, January 18, 2026

वाळाई

रोजच्या जीवनामध्ये सातत्याने संघर्षाचा सामना करणाऱ्या शिवानंद या मुलाची ही गोष्ट. तामिळनाडूतल्या एका छोट्याशा गावामध्ये तो राहत असतो. घरामध्ये आई, बहीण आणि तो असे तिघेजण. एका जमीनदाराच्या भल्यामोठ्या केळीच्या शेतांमध्ये केळीचे घड वाहण्याचे काम त्यांचे कुटुंब करत असते. शिवानंद शाळेत जायचा परंतु सुट्टीच्या दिवशी त्याला आई आणि बहिणीला मदत म्हणून केळांचे घड वाहण्याचे काम करावे लागायचेच. यातून येणारे त्यांचे उत्पन्न अत्यंत तुटपंजे होते. स्वतः शिवानंद शाळेमध्ये हुशार मुलगा होता. तो अतिशय आनंदाने शाळेमध्ये शिकायला जायचा. परंतु त्याला केळी वाहण्याचे काम आवडत नव्हते. ते टाळण्याकरता तो विविध क्लुप्त्या आजमावायचा. या गावातील जवळपास सर्वच लोक त्या केळीच्या शेतावर कामाला होते. एक दिवस जरी कामाला गेले नाही तरी जगण्यासाठी संघर्षाची परिस्थिती होती. बागायतदार देखील इथल्या लोकांना पिळून काम करायला लावायचा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिवानंदाचे शिक्षण आणि काम सातत्याने चालू होते. आपली बहीण वेंबू आणि सख्खा मित्र शेखर हे त्याच्या अत्यंत जवळचे. परंतु एके दिवशी अचानक एक भयावह घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडते. अगदी नशिबानेच तो स्वतः त्यातून वाचतो. आणि चित्रपट संपतो. 
चित्रपटाची गोष्ट गरिबीचे आणि संघर्षाचे विविध कंगोरे दाखवणारी आहे. आजही भारतातील बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांना रोजच्या जीवनासाठी संघर्ष करावा लागतो. शिक्षण की उदरभरण? यातून एकाची निवड करावी लागते. त्याचेच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे शिवानंद होय. शेवटच्या प्रसंगांमध्ये तर त्याला कित्येक वेळा अन्नापासून वंचित व्हायला लागते. आपल्या जवळच्या व्यक्ती गेल्यानंतरही पोटाची भूक त्याला शांत बसू देत नाही. एका हृदय द्रावक घटनेने चित्रपटाचा शेवट होतो. शेवटी दाखवलेल्या श्रेय नामावलीमध्ये सदर घटना चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे, असे दाखवले जाते. त्यामुळे शेवट मनामध्ये अधिकच घट्ट रुतून बसतो.

--- तुषार भ. कुटे

 


 

हॅरियर ईव्ही

मागच्या काही दिवसांपासून चालू असलेला हॅरियर ईव्ही गाडीचा शोध आज अखेर संपला. नवीन गाडी घेण्याच्या दृष्टीने अमोलने हॅरियर ईव्हीची निवड केली होती. अर्थात यासाठी अन्य पर्यायही उपलब्ध होते परंतु रश्मीला आणि मला हॅरियरच सर्वोत्तम गाडी आहे, हे माहीत होते. त्या दृष्टिकोनातून टाटा मोटर्स विविध शोरूममध्ये आम्ही चौकशी केलेली होती. सर्वच ठिकाणी जवळपास सारखीच किंमत सांगण्यात आली. शिवाय या गाडीसाठी रंगाचे पर्यायही मर्यादित होते. त्यावरूनही बराच खल झाला. नैनिताल ब्लू, प्युअर ग्रे तसेच पूर्णतः काळ्या रंगाच्या गाडीचाही विचार केला गेला होता. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या बघितल्या. तरी देखील त्यांचा निर्णय होत नव्हता. परंतु आज अखेर प्युअर ग्रे रंगाच्या गाडीवर शिक्कामोर्तब झाले. मागच्या पाच दिवसांपासून माझे सीडॅकमध्ये ट्रेनिंग चालू आहे. आज देखील दुपारी साडेतीनला ट्रेनिंग संपून घरी आलो. तोपर्यंत यांचे गाडी घेण्याचे प्रयोजन झाले होते. आजच बुकिंग केली तर २७ जानेवारीला गाडी मिळेल. म्हणूनच आजच गाडीची बुकिंग पूर्ण केली. अखेर प्युअर ग्रे रंगाची गाडी ठरली. माझ्या नेक्सॉन आणि हॅरियर या गाड्यांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. परंतु हॅरियरमध्ये नवनवीन वैशिष्ट्यांचा समावेश केल्याचे दिसते. शिवाय याची रेंज देखील पाचशेच्या वर आहे. त्यामुळे बऱ्याच लांबच्या प्रवासाला देखील गाडी वापरता येऊ शकेल. 
पंचजन्य ऑटोमोबाईलमध्ये गाडी बुक करत असताना केवळ मी आणि रश्मी होतो. ११००० रुपये देऊन बुकिंग पूर्ण केली. आणि २७ जानेवारीला गाडी येईल या प्रतीक्षेमध्ये इथून बाहेर पडलो. 


 

Saturday, January 17, 2026

पायथॉन प्रोग्रामिंग आणि वाचकांचा प्रतिसाद

पायथॉन प्रोग्रामिंगचे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून विशेषतः ग्रामीण भागांमधून अनेक विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा अभिप्राय मला मेलद्वारे तसेच मेसेजद्वारे प्राप्त होत होता. परंतु पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने या सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला मिळाली. पुस्तक महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाचक पुण्यामध्ये येत असतात. सांगली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, जळगाव, नांदेड, अमरावती तसेच रत्नागिरीसारख्या विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक वाचक याप्रसंगी मला भेटले. त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंगचे मराठी पुस्तक वाचले होते. त्यातूनच त्यांना प्रोग्रामिंग शिकता आली. काही शिक्षकांनी तर स्वतःहून या पुस्तकाची शिफारस विद्यार्थ्यांना केली होती. 
आपले पुस्तक वाचकांना आवडते आहे आणि त्यातून ते नवीन तंत्रज्ञान सहजपणे शिकत देखील आहेत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक लिहिले त्यांना त्याचा फायदा होतो आहे, ही माझ्यासाठी समाधानाची बाब होती. अनेकांनी पुस्तकाविषयीचे अनुभव देखील मला सांगितले. शिवाय अजूनही संगणक क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानावर मराठीतून पुस्तक नाही, ते तुम्ही लिहाल का? अशी विचारणा देखील केली. आपल्या लिखाणाला असे प्रोत्साहन मिळत असेल तर कोणताही लेखक अतिशय उत्साहाने पुस्तक लिहिल.
सध्या "प्रॅक्टिकल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स" या पुस्तकश्रृंखलेवर माझे काम चालू आहे. त्यातील चार पुस्तके यावर्षी प्रकाशित होतील. मला आशा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक क्षेत्रातील या तंत्रज्ञानाचे ज्ञान संपादन करण्यासाठी निश्चितच या पुस्तकांचा मोठा फायदा होईल. 

--- तुषार भ. कुटे. 


 

Friday, January 16, 2026

गुगल जेमिनी आता बनलाय खरा 'पर्सनल असिस्टंट': तुमच्या ईमेल्स आणि फोटोंचा वापर करून देणार अचूक उत्तरे!

गुगलने आपल्या 'जेमिनी' या एआय चॅटबॉटमध्ये एक मोठे आणि क्रांतिकारी अपडेट आणले आहे. या नव्या फीचरला "पर्सनल इंटेलिजन्स" असे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत जेमिनी तुम्हाला इंटरनेटवरील माहिती शोधून देत असे, पण आता ते तुमच्या परवानगीने तुमच्या वैयक्तिक ॲप्समधील माहितीचा वापर करून तुम्हाला मदत करू शकेल.
नेमकं काय आहे हे नवीन फीचर? साध्या भाषेत सांगायचे तर, आता जेमिनी तुमचे जीमेल, गुगल फोटो आणि युट्यूब यांच्याशी कनेक्ट करता येईल. यामुळे जेमिनीला तुमच्याबद्दलची माहिती समजेल आणि ते तुम्हाला अगदी तुमच्या गरजांनुसार उत्तरे देऊ शकेल.
याचा फायदा काय होईल? हे एका उदाहरणावरून समजून घेऊ. गुगलच्या ब्लॉगमध्ये एका युजरने दिलेले उदाहरण खूप रंजक आहे: समजा, तुम्ही तुमच्या गाडीचे टायर बदलण्यासाठी गॅरेजमध्ये उभे आहात आणि तुम्हाला गाडीच्या टायरची साईज किंवा नंबर आठवत नाही. पूर्वी काय व्हायचे? तुम्हाला गाडीच्या मॅन्युअलमध्ये शोधावे लागेल किंवा घरी कोणाला तरी फोन करावा लागेल.
आता जेमिनी काय करेल? तुम्ही जेमिनीला विचारले तर ते तुमच्या 'गुगल फोटोज'मध्ये जाऊन तुमच्या गाडीचा जुना फोटो शोधेल, त्यावरून टायरचा प्रकार ओळखेल. इतकेच नाही तर, जर गॅरेजवाल्याने गाडीचा नंबर मागितला, तर जेमिनी फोटोमधील नंबर प्लेट झूम करून तुम्हाला लगेच गाडीचा नंबरही सांगेल. तसेच, जीमेलमधील जुन्या बिलावरून गाडीचे मॉडेलही शोधून देईल. हे सर्व काम जेमिनी काही सेकंदात करेल, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल.
गुगलने स्पष्ट केले आहे की हे फीचर "बाय डीफॉल्ट ऑफ" असेल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः सेटिंगमध्ये जाऊन हे चालू करत नाही, तोपर्यंत जेमिनी तुमच्या ईमेल्स किंवा फोटोंना हात लावणार नाही. तुमचा डेटा गुगलच्या सुरक्षित सिस्टीममध्येच राहील. तुमचे वैयक्तिक फोटो किंवा ईमेल्सचा वापर करून एआयला 'ट्रेन' केले जाणार नाही. तुम्ही हे फीचर कधीही बंद करू शकता.
काही गमतीशीर चुकाही होऊ शकतात हे तंत्रज्ञान अजून नवीन आहे, त्यामुळे काही वेळा ते चुकीचे अंदाज लावू शकते. उदा: जर तुमच्या गुगल फोटोजमध्ये गोल्फ कोर्सवरचे तुमचे अनेक फोटो असतील, तर जेमिनीला वाटू शकते की तुम्हाला गोल्फ खेळायला आवडते. पण कदाचित तुम्ही तिथे फक्त तुमच्या मुलाचा खेळ बघायला गेला असाल. अशा वेळी तुम्ही जेमिनीला सुधारू शकता ("मला गोल्फ आवडत नाही, मी फक्त बघायला गेलो होतो").
सध्या हे फीचर फक्त अमेरिकेतील युजर्ससाठी 'बीटा' व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. लवकरच ते इतर देशांमध्ये आणि मोफत युजर्ससाठी सुद्धा उपलब्ध होईल.
थोडक्यात, गुगल जेमिनी आता केवळ एक सर्च इंजिन राहिले नसून, ते एका स्मार्ट असिस्टंटप्रमाणे तुमची वैयक्तिक कामे सोपी करण्यासाठी सज्ज होत आहे.

स्रोत: गुगल ब्लॉग 

--- तुषार भ. कुटे




Thursday, January 15, 2026

AI मुळे महिलांच्या सुरक्षिततेला धोका? तज्ज्ञांचा गंभीर इशारा

"द गार्डियन" वृत्तपत्रात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या माध्यमातून महिलांना त्रास देण्याचे प्रकार वेगाने वाढत आहेत. एलॉन मस्क यांच्या 'ग्रोक' एआयने अलीकडेच आक्षेपार्ह फोटो रोखण्यासाठी काही सुरक्षा नियम आणले असले तरी, तज्ज्ञांच्या मते ही समस्या आता हाताबाहेर जात आहे.
टेक्नॉलॉजीच्या जगात एआयने क्रांती घडवली आहे, पण त्याचा एक काळा चेहराही समोर येत आहे. अनेक युजर्स आता एआयचा वापर करून महिलांचे आक्षेपार्ह आणि अश्लील फोटो (Deepfake Nudes) तयार करत आहेत. रेडिट (Reddit) सारख्या प्लॅटफॉर्मवर काही युजर्स उघडपणे चर्चा करत आहेत की, एआयमुळे आता त्यांना "सामान्य पॉर्न" बघण्यात रस उरला नाही, कारण एआय त्यांना हव्या त्या व्यक्तीचे फोटो तयार करून देतो.
'ग्रोक' एआयने अशा फोटोंवर बंदी घालण्यासाठी काही "सेफगार्ड्स" (सुरक्षा उपाय) आणले आहेत. पण इंटरनेटवरील युजर्सनी त्यावरही पळवाटा शोधल्या आहेत. उदाहरणार्थ, जर एआयला थेट "नग्न फोटो" मागितले तर ते नकार देते, पण "आर्टिस्टिक न्युडिटी" (कलात्मक नग्नता) असे शब्द वापरून लोक हवे तसे फोटो बनवून घेत आहेत.
दुसरीकडे, 'क्लॉड' (Claude) सारखे काही एआय टूल्स अतिशय कडक आहेत. त्यांना जर एखाद्या महिलेच्या फोटोतील कपडे काढण्यास सांगितले, तर ते स्पष्ट नकार देतात. मात्र, चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी काही प्रमाणात 'बिकिनी' फोटो तयार करू शकतात, पण जास्त अश्लील फोटो बनवत नाहीत.
केवळ 'ग्रोक' नाही, तर इंटरनेटवर अशा शेकडो वेबसाईट आणि ॲप्स आहेत, ज्यांचे कामच मुळात महिलांचे कपडे डिजिटल पद्धतीने काढून (Nudification) अश्लील फोटो बनवणे हे आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मे २०२५ मध्ये अशा साईट्सवर २ कोटींहून अधिक लोकांनी भेट दिली होती. इतकेच नाही तर ॲपल आणि गुगलच्या ॲप स्टोअर्सवरही अशी ॲप्स उपलब्ध आहेत.
'इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक डायलॉग'च्या संशोधिका ॲन क्रॅनन यांच्या मते, हे केवळ अश्लीलतेपुरते मर्यादित नाही. याचा मुख्य उद्देश महिलांना अपमानित करणे आणि त्यांना गप्प करणे हा आहे. ब्रिटनमधील खासदार जेस असाटो यांनी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. त्यांनी या विरोधात आवाज उठवल्यामुळे, त्यांना लक्ष्य करण्यासाठी एआयचा वापर करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पसरवण्यात आले.
डरहम युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका क्लेअर मॅकग्लिन म्हणतात, "महिलांना एआय हे एक नवीन तंत्रज्ञान वाटण्याऐवजी, आता छळाचे एक नवीन साधन वाटू लागले आहे. यामुळे महिला ऑनलाईन जगापासून दूर जाण्याची भीती आहे."
थोडक्यात, एआयचे तंत्रज्ञान जसे प्रगत होत आहे, तसे त्याचा गैरवापर करून महिलांना लक्ष्य करण्याचे प्रकारही वाढत आहेत. यावर कडक निर्बंध नसतील, तर ही फक्त संकटाची सुरुवात असू शकते.

--- तुषार भ. कुटे



Wednesday, January 14, 2026

अदानी इलेक्ट्रिसिटी आणि गुजराती

महाराष्ट्रातील एका छोट्या शहरामध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने जाणे झाले. तिथून परतत असताना एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलो होतो. याच ठिकाणी इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन देखील होते. ते अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीने बांधले होते. 
या कंपनीचे चार्जिंग स्टेशन मला पहिल्यांदाच पाहायला मिळाले. अर्थात यामुळेच त्यांचे अँड्रॉइड ॲप्लिकेशन माझ्या फोनमध्ये नव्हते. मी ते गुगल प्ले स्टोअरवर शोधले आणि इन्स्टॉल केले. हे ॲप्लिकेशन जेव्हा उघडले तेव्हा त्याने मला भाषेचा पर्याय विचारला. त्यामध्ये तीन भाषांचा पर्याय होता. इंग्रजी, हिंदी आणि गुजराती. महाराष्ट्रामध्ये सेवा देऊनही अनेक कंपन्या मराठी भाषेचा पर्याय देत नाहीत. यात विशेष नाही कारण अशा अनेक निर्लज्ज कंपनी आहेत ज्या मराठी भाषेला महत्त्व देत नाहीत. मराठी माणूसच ती मागणी करत नाही किंवा मराठी माणसालाच आपल्या भाषेचे काही देणे घेणे नाही म्हणून कंपन्यादेखील मराठीचा विचार करत नाही, हेही तितकेच सत्य. पण विशेष म्हणजे ज्या कंपनीच्या मालकाची मातृभाषा गुजराती आहे,तिचा पर्याय देखील या ॲप्लिकेशनमध्ये दिलेला होता. म्हणजे त्यांना आपल्या मातृभाषेचा किती अभिमान आहे हे यातून दिसून येते. आपले मराठी लोक मात्र सातत्याने हिंदी भाषेचा प्रचार करत असतात. आणि मराठीला नेहमीप्रमाणे दुय्यम स्थानी नेऊन बसवतात. त्यांच्यासाठीच ही पोस्ट. 

शेवटी इन्स्टॉल केलेले ॲप्लिकेशन अनइंस्टॉल केले. कंपनीला मराठी भाषेचा पर्याय देण्यासाठी सविस्तर मेल केला. आणि परतीच्या मार्गाने लागलो.


 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जादुई दुनियेत

मागच्या काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर शेकडो व्याख्याने दिली. परंतु सर्वच इंग्रजी भाषेतून होती. काही महिन्यांपूर्वी पेणमधील एका विज्ञान महाविद्यालयामध्ये पहिल्यांदाच या तंत्रज्ञानावर मराठीतून बोलण्याची संधी मिळाली. परंतु त्यावेळी प्रेझेंटेशन अर्थात सादरीकरण इंग्रजी मधून होते. यावर्षी मात्र पहिल्यांदाच सादरीकरण देखील मराठीमध्ये करता आले. 
पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी अत्रे यांनी एका प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बोलावले होते. या कार्यक्रमातील व्हिजन टॉकसाठी माझा विषय होता "कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जादुई दुनियेत." अत्रे मॅडमनी मला पूर्णपणे मराठीतून सादरीकरण करण्यासाठी सांगितले होते. खरं तर अशी संधी क्वचितच मिळते. इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच प्रेसेंटेशन स्लाइड्स देखील पूर्णतः मराठीमध्ये बनवल्या. या तंत्रज्ञानातील विविध पैलूंची, संकल्पनांची सविस्तर माहिती आणि विवेचन व्याख्यानातून करता आले. मातृभाषेतून बोलताना सादरीकरण करताना जी सहजता प्राप्त होते ती अन्य भाषेत होत नाही. शिवाय वक्ता आणि श्रोता यांचीही भाषा एकच असेल तर विषय लवकर समजतो. हा विश्वास या निमित्ताने अधिक दृढ झाला.
मागच्याच महिन्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर माझे पुस्तक देखील प्रकाशित झाले होते. यामध्ये या तंत्रज्ञानाची निगडित अनेक गोष्टींची मी चर्चा केलेली आहे. या सर्व बाबी विस्ताराने माझ्या व्याख्यानामध्ये समजावून सांगता आल्या. 
खरंतर तंत्रज्ञानाला कोणत्याही भाषेचे बंधन नसते. आपणच भारतीय म्हणून तिला इंग्रजी भाषेच्या बंधनात बांधून घेतलेले आहे.

--- तुषार भ. कुटे


Sunday, January 11, 2026

तोत्तोचान

प्रत्येकाच्या जीवनामध्ये तसेच व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठा वाटा असतो तो त्याच्या शाळेचा. शाळेतील अनुभव, संस्कार तसेच तिथे लागलेल्या सवयी आपले आयुष्य घडवतात. म्हणून आपली शाळाच आपले व्यक्तिमत्व घडवते, असे बोलले तर वावगे ठरणार नाही.
तेत्सुको कुरियोसाकी यांच्या स्वतःच्या शाळेतील अनुभव “तोत्तोचान” या पुस्तकांमध्ये त्यांनी मांडलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये निसर्गाच्या सानिध्यात एका कल्पक, स्नेहशील आणि ध्येयवेड्या मुख्याध्यापकाची तोमाई नावाची शाळा. ती सुरू केल्यानंतर केवळ सात ते आठ वर्षांमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात जळून गेली. परंतु इतक्या अल्प कालावधीमध्ये या शाळेने अक्षरशः विद्यार्थी घडवले! अर्थात यामागे तिथल्या मुख्याध्यापकांचा सिंहाचा वाटा होता. अनुभव आधारित शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या मनाची जाण ठेवून शिकवणारे शिक्षक या शाळेमध्ये होते. शाळेतील सर्व घटनांचे वर्णन करणारे हे पुस्तक म्हणजे तोत्तोचान.
तोत्तोचान अर्थात तेत्सुको कुरियोसाकी ह्या या पुस्तकाच्या लेखिका आहेत. शिवाय युनिसेफच्या सद्भावना दूत देखील. आजच्या आपल्या शिक्षणाच्या बजबजबुरीमध्ये एक अनोखा संदेश देणारे हे पुस्तक निश्चित वाचायला हवे!

--- तुषार भ. कुटे

 


 

Saturday, January 10, 2026

"क्रांतीज्योती"च्या निमित्ताने...

मागच्या दशकभरापासून मराठी भाषा हा सातत्याने राजकारणाचा विषय होऊ लागला आहे. भाषा हीच आपली ओळख आणि आपली संस्कृती असते. परंतु जेव्हा स्वभाषिक लोकांनाच तिचा विसर पडायला लागतो तेव्हा खरोखर विविध माध्यमांद्वारे समाज प्रबोधनाची गरज भासते. "क्रांतीज्योती विद्यालय- मराठी माध्यम" या चित्रपटाने देखील अशाच समाज प्रबोधनाची वाट जोखलेली आहे.
महाराष्ट्र हे देशातील एक अष्टपैलू राज्य. ज्याने अनेक विभूतींना जन्म दिला. यातील अनेकांनी आपल्या देशाचे नाव जगात गाजवले. विशेष म्हणजे जवळपास सर्वच जण आपल्या मातृभाषेतून शिकले होते. मातृभाषेतील शिक्षणातून त्यांचा पाया पक्का होत गेला. शिवाय अप्रत्यक्षपणे आपल्या मराठी भाषेचा देखील प्रसार झाला. परंतु मागच्या दोन-एक दशकांपासून जागतिक भाषा म्हणवल्या गेलेल्या इंग्रजी माध्यमातील शाळांचे प्रस्थ वेगाने वाढत आहे. अगदी पहिल्यापासूनच आपल्या मुलांनी इंग्रजीतुन शिक्षण घेतले की आपण जागतिक नागरिक बनू. शिवाय भविष्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असं नवपालकांना वाटू लागले आहे. आता केवळ इंग्रजी हेच भविष्य. त्यामुळे इंग्रजी भाषेतून शिकण्यास पर्याय नाही. असे विविध गैरसमज तयार झाल्याने विविध इंटरनॅशनल बोर्डांच्या आंतरराष्ट्रीय शाळा तयार झाल्या. त्यांनी फाईव्ह स्टार सुविधा द्यायला सुरुवात केली. आणि यातून एक शैक्षणिक अर्थव्यवस्था तयार झाली. इंग्रजीतून शिकलो नाही म्हणूनच आम्ही मागे पडलो, असा अनेकांचा समज झालेला आहे. म्हणूनच मराठी लोक आता आपली पुढची पिढी इंग्रजीतून शिकवित आहेत. या पिढीचे ज्ञानग्रहण व समज कितपत विकसित झाली आहे? हा संशोधनाचा विषय. परंतु यामुळे लाखा-लाखांवर पैसे भरून पालक इंग्रजी शाळांचा गल्ला भरत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ मराठी शाळांमध्ये ज्ञान दिले जात नाही का? यापूर्वीची पिढी मराठीतूनच शिकली. आज सर्वजण आत्मविश्वासाने विविध ठिकाणी कार्य करत आहेत. पण तरी देखील अनेकांना मराठी भाषेतून आपल्या मुलांना शिकवायचे नाही. असे का? तर याचे पहिले उत्तर आहे स्टेटस...
इंग्रजी भाषा म्हणजे लय भारी. इंग्रजी ही जगाची भाषा. इंग्रजी शाळा म्हणजे हाय-फाय शाळा. इंग्रजी शाळा म्हणजे इंटरनॅशनल शाळा. अशा बऱ्याच गोष्टींमुळे इंग्रजी या नावाभोवती एक स्टेटस तयार होत गेलेले आहे. म्हणूनच मराठी शाळा आता "डाऊनमार्केट" झालेल्या आहेत. पालकांना आपलं मूल इंटरनॅशनल स्कूलमधून शिकतं, हे सांगायला अतिशय अभिमान वाटतो. ते मूल कितपत शिकतं? याविषयी त्यांनाही फारशी माहिती नसावी. एखाद्या शाळेची फी जितकी जास्त तितकी शाळा भारी, या गैरसमजातून इंग्रजी शाळा वाढतायेत आणि मराठी शाळा मागे पडत आहेत. जे शिक्षण इंग्रजीतून मिळतं तसंच किंबहुना त्याहून अधिक व्यवस्थित समजणारं मराठी शाळेतूनही मिळतं. पण मराठी शाळेला स्टेटस नाही... काय करायचं?
इंग्रजीतून शिकणं आणि इंग्रजी शिकणं यामध्ये खूप फरक आहे, याची कल्पना आजही अनेकांना नाही. एखाद्या परभाषेतून ज्ञानग्रहण करत असताना बुद्धीची समज तोकडी पडते. आणि मग मेंदूचा हवा तितका विकास होत नाही, असं भाषातज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांचा देखील मत आहे. परंतु पालकांना याचे काहीही पडलेले नाही. स्वतः एका छोट्या गावातल्या ग्रामीण मराठी शाळेतून शिकून त्यांनी प्रगतीची द्वारे स्वतःसाठी खुली केली. संघर्ष केला. त्यातूनही शिकले. परंतु मुलाच्या बाबतीत असे पालक मातृभाषेतील शिक्षणाविषयी आग्रही नाहीत. त्यांनी 'का?' हा प्रश्न स्वतःला विचारावा. 
क्रांतीज्योती चित्रपटामध्ये अखेरच्या प्रसंगामध्ये मुख्याध्यापक शिर्के सर हे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी बऱ्याच गोष्टी सांगतात. त्या सर्वांनी ऐकण्यासारख्या अशा आहेत. आणि अनेक विचार हे सुविचारासारखे लिहून ठेवण्यासारखे आहेत. तसेच प्रामुख्याने आचरणात आणण्यासारखे आहेत. आपली बुद्धी विकसित झाली, पण त्याचा योग्य वापर आपण करतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला मानसिक समाधानापेक्षा भौतिक सुखांची ओढ असते. अर्थात तो मानवी स्वभाव आहे. पण यातून आपण काय गमावतो, हे वेळ गेल्यानंतरच लक्षात येते. इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. 
मागच्या काही वर्षांपासून मी असे अनेक पालक पाहिलेले आहेत, ज्यांचं मोठं मूल इंग्रजी माध्यमात तर लहान मुल मराठी माध्यमात शिकत. असं का बर होत असावं? अर्थातच या प्रश्नांची उत्तरे मी वरच्या परिच्छेदांमध्ये दिलेली आहेतच. 
विषय मराठी शाळा वाचवण्याचा आहेच... पण पुढील पिढी घडवण्यासाठी मनाला भिडणारं, समजणारं मातृभाषेतील शिक्षण गरजेचं आहे. त्यातूनच सुजाण नागरिक तयार होणार आहेत. जे विचारी असतील, संवेदनशील असतील आणि त्यांच्याकडे उच्च दर्जाची निर्णयक्षमता देखील असेल. 
अर्थातच या सर्वांचे फलित असे की, शाळा टिकल्याने आपली भाषादेखील टिकेल.... आणि संस्कृतीसुद्धा!

--- तुषार भ. कुटे


 

Friday, January 9, 2026

शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स

विद्या प्रतिष्ठानच्या “शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या संस्थेला भेट देण्याचा योग आला. मागच्याच आठवड्यामध्ये या संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन झाले होते. मी स्वतः आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने या नव्या संस्थेविषयी माझ्या मनातही कुतूहल होते. प्रत्यक्ष संस्थेला भेट दिल्यानंतर मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. परंतु या तंत्रज्ञानाच्या विकसनाचा विचार केल्यास अजूनही भारत अनेक देशांच्या कित्येक मागे असल्याचे दिसते. किंबहुना आपले आपली विद्यापीठे तसेच तंत्रज्ञान संस्था एआय विकसित करण्याच्या दृष्टीने लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही फारशा गांभीर्याने उपलब्ध करून देताना दिसत नाहीत. म्हणूनच या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय विकसकांना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी क्लाऊडचा वापर करून तंत्रज्ञान एका अर्थाने उसने घ्यावे लागते. परंतु विद्या प्रतिष्ठानच्या या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञान तसेच इन्फ्रास्ट्रक्चर मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्याचे दिसून आले. शिवाय डेटा सायन्स, बिझनेस इंटेलिजन्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग, सायबर सेक्युरिटी,  इंटरनेट ऑफ थिंग्स अशा विविध एआय आधारित शाखांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळांची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ड्रोन आणि इंटरनेट ऑफ थिंग्समधील उत्पादने तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हार्डवेअरची गरज असते. आणि ही अद्ययावत हार्डवेअर्स अतिशय महाग असतात. विद्यार्थ्यांना यामध्ये प्रकल्प विकसित करायचे असल्यास खर्चिक होते. ही सर्व प्रकारचे हार्डवेअर्स इथल्या प्रयोगशाळांमध्ये दिसून आली.
पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील निमशहरी ठिकाणी अशा प्रकारच्या प्रयोगशाळा असणारी संस्था म्हणजे आश्चर्यच होते. या पद्धतीचे  इन्फ्रास्ट्रक्चर मला अजूनही पुण्यातल्या कोणत्याही विद्यापीठात किंवा तंत्रज्ञान संस्थेमध्ये दिसलेले नाही. ज्या तंत्रज्ञानाला गांभीर्याने घ्यायला हवे ते अजूनही मोठमोठ्या संस्था घेत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. म्हणूनच बारामती सारख्या छोट्या शहरामध्ये विद्या प्रतिष्ठानने उभारलेला हा उपक्रम खरोखर स्पृहणीय आणि अभिनंदन असाच आहे.

—  तुषार भ. कुटे

#AI #ArtificialIntelligence


 

Thursday, January 8, 2026

हाकामारी - हृषिकेश गुप्ते

हाकामारी या भूतांमधल्या एका वेगळ्या पात्राबद्दल नारायण धारप यांच्या कादंबरीतून पहिल्यांदा वाचले होते. त्यानंतर इंटरनेटवरच्या काही छोट्या छोट्या कथांमधून ही हाकामारी समोर आली. हृषिकेश गुप्ते यांच्या "हाकामारी" या लघुकादंबरीतून तिची पुनश्च ओळख झाली. मागच्या वर्षी याच लेखकाची "काळजुगारी" ही कादंबरी वाचली होती. त्यांची लेखन शैली ही वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आजच्या अनेक लेखकांपैकी अतिशय कमी लेखकांना वाचकांना असे खिळवून ठेवता येते. ही कादंबरी वाचायला घेतल्यानंतर अगदी दीड तासांमध्येच समाप्त झाली.


लेखकाने स्वतःचे बालपण केंद्रस्थानी ठेवून कथेची मांडणी केली आहे. कथा निम्म्यापर्यंत येऊनही हाकामारीचे कोणतेही लक्षण दिसत नाही! परंतु त्यानंतर जसजशी कथा पुढे सरकते तसे विविध प्रसंग वाचकांच्या मनावर पकड घ्यायला लागतात. हाकामारीची एन्ट्री होते. पुन्हा काही कारणास्तव कथा एका वेगळ्या दिशेला सरकते. ही किंबहुना भरकटलेली दिशा पुन्हा कथेला योग्य मार्गावर आणून ठेवते आणि हाकामारी परत चर्चेला येते. शेवटाकडे जाताना एका अनपेक्षित प्रसंगाने आपण हादरून जातो. आणि या प्रसंगाची तसेच हाकामारीची सांगड घातलेली आपल्याला समजते. अनेक प्रश्न मग आपल्या मनाला पडतात. आणि नंतर लेखकच वेगवेगळ्या शक्यतांचा आधार घेत या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देऊ लागतो. एका अर्थाने आपल्या शोधक मनाचा तो ताबाही घेतो. त्यामुळेच ही गोष्ट रंजक बनलेली आहे. कथा वेगाने पुढे सरकते म्हणूनच एकदा पुस्तक हातात घेतले की खाली ठेववत नाही. 
भयकथा वाचकांसाठी ही एक सुंदर लघुकादंबरी आहे.

--- तुषार भ. कुटे

#book #review #marathi #pustak #suspense



Tuesday, January 6, 2026

झाला आनंद आली बहार !

तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की, एखादा विषय सतत डोक्यात घोळत राहतो. त्यावर आपण अनेकदा विचार मंथन करतो. आपले विचार देखील सातत्याने विविध ठिकाणी मांडत राहतो आणि एक दिवस एका चित्रपटाच्या माध्यमातून आपले सर्व विचार पडद्यावर दिसायला लागतात....  
आमचं सांगायचं झालं तर "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" या चित्रपटाद्वारे असंच काहीतरी आमच्या बाबतीत घडलं. हेमंत ढोमेने या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासूनच चित्रपट प्रदर्शित होण्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत होतो. तो प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पहायचा होता. परंतु काही कारणास्तव शक्य झाले नाही.
का कुणास ठाऊक पण चित्रपट पडद्यावर सुरू झाला, श्रेय नामावली दिसायला लागली आणि हलकेच माझ्या स्वतःच्या शाळेच्या आठवणी जागृत झाल्या. नकळतपणे डोळ्यांमध्ये पाणी तरळू लागले होते. एका अर्थाने अगदी पहिल्या सेकंदापासून मी चित्रपटांमध्ये गुंतून जाऊ लागलो. हा चित्रपट मराठी शाळांच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करतो. याविषयी सर्वांनाच कल्पना आहे. परंतु मराठी भाषा हा विषय केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा पुढे सरकते, असे मला जाणवले. मागच्या काही वर्षांपासून आपल्या भाषेविषयीची मतमतांतरे विविध माध्यमांद्वारा प्रसूत होताना दिसतात. उत्तरेकडील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी स्थलांतरे आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये इंग्रजी माध्यमाचं वाढत चाललेलं प्रस्थ या दोन बाबींमुळे महाराष्ट्रामध्ये मराठीचं अस्तित्व धोक्यात आलेले आहे. दोन्ही गोष्टी एका अर्थाने राजकारणाशी निगडित. परंतु यातील दुसरी गोष्ट अर्थात मराठी शाळांची अवस्था हा ही सर्वसामान्य लोकांच्या हातात असलेली. मागच्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेल्या अनेक प्रसिद्ध आणि बड्या व्यक्ती या मराठी माध्यमातूनच शिकलेल्या आहेत. मराठी भाषेतून अर्थात आपल्या मातृभाषेतून त्यांनी ज्ञानग्रहण केले व प्रगतीचा मार्ग शोधला. परंतु जागतिक भाषा म्हणून उदयास आलेल्या इंग्रजीने नवपालकांना आकर्षित केले. शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा त्यांना सुविधा महत्त्वाच्या वाटू लागल्या. आणि याच कारणास्तव मराठी शाळा बंद व्हायला लागल्या. इंग्रजी शाळेत किती ज्ञान मिळते? हा संशोधनाचा विषय आहे. परंतु स्टेटसचा विषय तयार झाल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. अशाच एका बंद होत असलेल्या शाळेसाठी उभ्या ठाकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची गोष्ट या चित्रपटामध्ये अत्यंत प्रभावीपणे हेमंत ढोमे याने मांडलेली आहे. चित्रपट एका सामाजिक प्रश्नावर भाष्य करत असला तरी देखील अनेक प्रसंग विनोदी ढंगाने दाखवलेले आहेत. शाळेतल्या जुन्या आठवणी ताजे करणारे प्रसंग आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. आठवणींमध्ये रमायला लावतात. आणि हलकेच पापण्यांच्या कडा ओलावतात देखील... 
एक गोष्ट मात्र खरी की भाषा वाचवायची असेल तर सर्वप्रथम त्या भाषेच्या शाळाच वाचवायला हव्यात. आपण ज्या भाषेतून शिकलो त्या भाषेविषयी मनामध्ये अत्युच्च प्रमाणात आपुलकी असते. आणि म्हणूनच ही भाषा पुढच्या पिढीकडे जाते. परंतु शाळाच टिकल्या नाही तर भाषा टिकणे अत्यंत अवघड आहे. असा मोलाचा संदेश हा चित्रपट आपल्याला देतो. इंग्रजी बोलणं हे एक कौशल्य आहे. त्याकरता मातृभाषेतील शिक्षणाचा गळा अनेक पालक घोटताना दिसत आहेत. बाकी कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सर्वांच्याच भूमिका दमदार आहेत. त्यातही अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांना तोडच नाही. दिग्दर्शन आणि संवाद लेखनासाठी १०० पैकी १०० गुण.
आज हा चित्रपट चार कोटींचा गल्ला प्राप्त करून घोडदौड करत आहे. तरी अजूनही इंटरनॅशनल स्कूलच्या बाबतीत आग्रही असणाऱ्या अनेक पालकांनी हा चित्रपट पाहिला नसावा. त्यांनी चित्रपटगृहात जाऊन किमान हा चित्रपट पहावा, हीच अपेक्षा. हा एक केवळ चित्रपट नाही तर डोळे मिटून दूध पिणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. तो फक्त मनोरंजनासाठी किंवा मराठी चित्रपटांचा प्रसार करण्यासाठी बघू नका.... त्यातून बोध घ्या आणि आचरणात देखील आणा... 
इतकी उत्तम कलाकृती सादर केल्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे शतशः आभार... 

--- तुषार भ. कुटे


 

Saturday, January 3, 2026

ट्युरिंग अवॉर्ड: संगणक विश्वातील सर्वोच्च सन्मान

आजच्या आधुनिक युगात आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे तंत्रज्ञान वापरतो, त्यामागे अनेक महान बुद्धिमंतांची तपश्चर्या आहे. आपण वापरत असलेला स्मार्टफोन असो, इंटरनेट असो किंवा विविध ॲप्स, या सर्वांचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 'ट्युरिंग अवॉर्ड' दिला जातो. संगणकशास्त्र किंवा कॉम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रातील हा जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, विज्ञानात ज्याप्रमाणे 'नोबेल' पारितोषिकाला महत्त्व आहे, तितकेच महत्त्व संगणक विश्वात ट्युरिंग अवॉर्डला आहे. त्यामुळेच याला 'संगणक क्षेत्रातील नोबेल' असेही संबोधले जाते.

या पुरस्काराचे नाव ॲलन ट्युरिंग या महान ब्रिटीश गणितज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ॲलन ट्युरिंग यांना आधुनिक संगणक शास्त्राचे जनक मानले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने तयार केलेला अत्यंत अवघड 'एनिग्मा' कोड तोडून त्यांनी दोस्त राष्ट्रांचा विजय सुकर केला होता आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले होते. एवढेच नाही, तर आज आपण ज्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा करतो, त्याची मूळ संकल्पना अनेक दशकांपूर्वी त्यांनीच मांडली होती. त्यांच्या या अफाट बुद्धिमत्तेचा आणि योगदानाचा आदर करण्यासाठी हा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.

हा प्रतिष्ठित पुरस्कार 'असोसिएशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी' (ACM) या संस्थेकडून दरवर्षी प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूपही तितकेच भव्य आहे. विजेत्याला सन्मानचिन्हासोबत १० लाख अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनुसार सुमारे ८ कोटी रुपयांची रक्कम दिली जाते. या बक्षीसासाठी गुगलसारख्या बड्या कंपनीकडून आर्थिक साहाय्य केले जाते. हा पुरस्कार मिळवणे ही कोणत्याही संगणक शास्त्रज्ञासाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी असते. हा पुरस्कार अशाच व्यक्तीला दिला जातो, ज्याने संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले संशोधन हे केवळ तात्पुरते नसून त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा आहे.

या पुरस्काराने आजवर अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले आहे, ज्यांच्या कामामुळे तुमचे आणि आमचे आयुष्य सुखकर झाले आहे. उदाहरणार्थ, 'सर टिम बर्नर्स-ली' यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, ज्यांनी 'वर्ल्ड वाइड वेब'चा (WWW) शोध लावला. आज आपण इंटरनेटवर जी कोणतीही माहिती पाहतो, ती त्यांच्यामुळेच शक्य झाली आहे. त्याचप्रमाणे, विंट सर्फ आणि बॉब कान यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे, ज्यांना 'इंटरनेटचे जनक' म्हटले जाते. त्यांनी संगणकांना एकमेकांशी जोडण्याची पद्धत विकसित केली. तसेच, 'C' लँग्वेज आणि युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम बनवणारे केन थॉम्पसन आणि डेनिस रिची यांचाही यात समावेश आहे. अलिकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि 'डीप लर्निंग'मध्ये क्रांती घडवणारे योशुआ बेंगियो, जेफ्री हिंटन आणि यान लिकुन यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ राज रेड्डी यांना १९९४ मध्ये ट्युरिंग अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात, विशेषतः संगणकाला मानवी भाषा आणि दृश्ये समजून घेण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानात, मोठे योगदान दिले आहे.

शेवटी, ट्युरिंग अवॉर्ड हा केवळ एक पुरस्कार नसून तो मानवी कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्तेचा उत्सव आहे. ज्या संशोधकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शून्यातून हे अवाढव्य डिजिटल विश्व उभे केले, त्या पडद्यामागच्या नायकांना हा पुरस्कार जगासमोर आणतो. ॲलन ट्युरिंग यांनी लावलेल्या ज्ञानाच्या रोपट्याचा आज जो विशाल वटवृक्ष झाला आहे, त्याचे प्रतीक म्हणजे हा पुरस्कार होय.

--- तुषार भ. कुटे

#AlanTuring #Turing #TuringAward #Marathi #Nobel


९९ वे मराठी साहित्य संमेलन

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाली तेव्हाच ठरवले होते की यंदाच्या संमेलनासाठी साताऱ्याला जायचे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अमोलची तब्येत फारशी बरी नसल्याने आमचे नियोजन अधांतरीत होते. याही परिस्थितीमध्ये मार्ग काढत संमेलनाच्या चार दिवसांपैकी एका दिवशी जाणे आम्ही निश्चित केले. तो दिवस होता २ जानेवारी २०२६. 
सातारा पुण्यापासून फार फार तर सव्वाशे किलोमीटर अंतरावर. त्यामुळे दोन ते अडीच तासांचा रस्ता. सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जाण्याची आम्ही ठरवले होते. पुण्यातून निघता निघता साडेअकरा वाजले. मोशी होऊन कर्वेनगरला आणि कर्वेनगर होऊन थेट साताऱ्याच्या दिशेने प्रयाण केले. कालचा संमेलनाचा पहिला दिवस होता. त्यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी जम बसलेला असेल, असे वाटूनच आम्ही साताऱ्याच्या दिशेने प्रयाण केले. बऱ्याच महिन्यानंतर अमोल इतक्या लांबचा प्रवास करणार होता. त्यामुळे थांबत थांबतच आम्ही प्रवास करत होतो. दुपारी दोनच्या सुमारास साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर संमेलन स्थळी पोहोचलो. यापूर्वी सन २०२० मध्ये नाशिकला सर्वप्रथम साहित्य संमेलनाला उपस्थित राहता आले होते. साताऱ्यातील ही आमची दुसरी वेळ. तशी बऱ्यापैकी गर्दी होती. परंतु मागचे तीन वर्षे पुणे पुस्तक महोत्सवातील गर्दी पाहत असल्याने ही गर्दी फार काही वाटली नाही. पुस्तक प्रकाशकांचा आणि विक्रेतांसाठी एक डोम बनवला होता. पुण्यातील बहुतांश पुस्तक प्रकाशक या ठिकाणी होते. मागच्या तीन-चार वर्षांमध्ये बऱ्याच जणांशी ओळखी झालेल्या आहेत. आणि त्या दिवसेंदिवस वृद्धिंगत देखील होत आहेत. साकेत प्रकाशनाच्या स्टॉलवर मला मधुश्री पब्लिकेशनने माझे प्रकाशित केलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पुस्तक देखील दिसले. म्हणजे यावर्षीच्या साहित्य संमेलनामध्ये मी देखील अप्रत्यक्षरीत्या  तिथे होतो. मधुश्री पब्लिकेशनच्या स्टॉलवर शरद अष्टेकर देखील भेटले. इथे देखील माझे पुस्तक होते. अनेकांशी भेटीगाठी झाल्या. दुपारच्या सुमारास कवी संमेलन देखील होते. या ठिकाणी थोड्या वेळ बसण्याचा योग आला. साडेचारच्या सुमारास आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
पुण्याच्या दिशेने परतताना उताराचा रस्ता असल्याने तशी गाडीला चार्जिंग करण्याची गरज नव्हती. परंतु जोखीम न पत्करता एका हॉटेलपाशी चार्जिंग केली आणि परतीच्या मार्गाला लागलो.
पुढच्या वर्षी शंभरावे साहित्य संमेलन होणार आहे. आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की, ते पुणे अथवा पिंपरी चिंचवड सारख्या भागामध्ये व्हावे. आशा करूया की आमची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल.

--- तुषार भ. कुटे


 

Friday, January 2, 2026

दिवस संकल्पचा

एक जानेवारी अर्थात वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाच्या संकल्पचा दिवस देखील. बरोबर एक वर्षापूर्वी मी लिहून काढलेले संकल्प पुन्हा एकदा आठवले. त्यातले ५०% पेक्षा अधिक संकल्प देखील पूर्ण झाले नव्हते. तरीदेखील यावर्षी पुन्हा नव्याने, नव्या जोमाने संकल्प करायला सिद्ध झालो. वाचन, लेखन, आरोग्य आणि भ्रमंती याविषयीच बहुतांश संकल्प निगडित असतात. यावर्षी काही वेगळी परिस्थिती नाही. आपल्याला इतकेच पैसे मिळवायचे आहेत, असा काही संकल्प मी आजवर केलेला नाही. कदाचित याच कारणास्तव खोऱ्याने ओढता येईल इतका पैसा आमच्याकडे येत नाही. मागच्या दोन-तीन दिवसांपासून समाज माध्यमांवर विविध वर्तमानपत्रांच्या पानांवर कोणत्या राशीला शुभयोग आहेत? हे दाखवतायेत. त्यामध्ये माझी तूळ रास देखील आहे. या राशीला २०२६ मध्ये भरभराटीचा योग आहे, असं सर्वच ज्योतिषांचं म्हणणं आहे. माझा या ज्योतिषशास्त्रावर काडीचाही विश्वास नाही. पण तरी देखील आपल्या समाधानासाठी अशा गोष्टी मी देखील चवीने वाचतो. असो. आपले प्रयत्न करीत राहिलं की यश मिळतच, हे मी पक्क जाणून आहे. 
यावर्षीचा मुख्य संकल्प हा लेखनाचा आहे. मागच्या वर्षी तीन पुस्तकं लिहिली आणि प्रकाशित देखील झाली. ई-बुक्स विचार केला तर तीन-चार पुस्तक तर आरामात झाली होती. यावर्षी लिखाणाचा हा संकल्प अधिक वेगाने चालू ठेवायचा आहे. जी पुस्तकं मला यावर्षी लिहायची आहेत त्यांची मुखपृष्ठ तयार केले प्रिंट काढल्या आणि समोरच्या भिंतीवर लावून ठेवलेल्या आहेत. जेणेकरून मला सातत्याने या पुस्तकांची आठवण होत राहील. यावर्षी प्राकृत प्रकाशनाच्या प्रगतीकडे अधिक जोमाने लक्ष द्यायचे आहे. कमीत कमी २५ प्रिंट पुस्तके तरी बाजारात यावी, असा मानस आहे. वाचनाचा संकल्प विचारात घेतला तर यावर्षी अधिकाधिक पुस्तके वाचून काढू असं मनाशीच ठरवलं आहे. त्या दृष्टीने आज पहिल्याच दिवशी ऋषिकेश गुप्ते यांची दोन पुस्तकं वाचून काढली. त्यापैकी एक दीर्घकथासंग्रह तर दुसरी लघुकादंबरी होती. वाचनाला वेग तर येतो आहे. बघूया पुढे काय होतं ते. 
लिखाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अन्य संगणक तंत्रज्ञानाशी निगडित बरेच विषय मनात घोळत आहेत. प्रिंट बुक नाही निघाल्या तरी यावर्षी निदान ई-बुक तरी प्रकाशित करायचं असं ठरवलं आहे. मागच्या वर्षी कमीत कमी बारा किल्ल्यांची भ्रमंती करावी असं ठरवलं होतं. परंतु प्रत्यक्षात केवळ एकाच किल्ल्यावर जाता आले. बारास एक हे गुणोत्तर अगदीच नगण्य आहे. कदाचित यावर्षी किमान १२ चा आकडा तरी पार करू असं वाटतंय. 
बऱ्याच गोष्टींचा दृश्यीकरण करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्या मधून ती गोष्ट सातत्याने आपल्या मनावर ठासत राहते. म्हणूनच सर्व गोष्टी लिहून आणि सातत्याने डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न राहील. मागील वर्ष अतिशय खराब होतं. एकंदरीतच आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये घडलेल्या नकारात्मक घडामोडींमुळे २०२५ काही चांगले गेले नाही. परंतु २०२६ मध्ये परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होईल, अशी आशा आहे. बघूया नव्या सकारात्मक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात तर झाली आहेत आता पुढची पावले अधिक आत्मविश्वासाने टाकता येतील.


--- तुषार भ. कुटे 

Thursday, January 1, 2026

“अनस्टॉपेबल अस” - खंड दुसरा

लाखो वर्षांच्या सेपियन्सच्या प्रवासामध्ये घडलेल्या घडामोडींचे वर्णन युवाल नोवा हरारी यांच्या ‘अनस्टॉपेबल अस’ या ग्रंथशृंखलेमध्ये अनुभवता येते. पहिल्या खंडामध्ये माणसाने जग कसं जिंकलं? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. याच्याच पुढे जग न्याय का नाही? या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या खंडामध्ये मिळते.
मनुष्य हा पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांमधील एक प्राणी असला तरीही त्याने आपल्या मेंदूच्या बळावर अकल्पित अशी प्रगती करून दाखवली. आणि या प्रगतीचा वेग अजूनही वाढतोच आहे. आपल्या मेंदूच्या बळावर त्याने पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील अनेक प्राण्यांवर नियंत्रण मिळवले. यातूनच तो जग जिंकायला लागला. हजारो वर्षांच्या प्रगतीच्या कालखंडामध्ये अनेक चढ उतार अनुभवत माणसाने स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आणि यातूनच न्याय-अन्यायाची संकल्पना उदयास झाली. अनेक समस्यांवर त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर तोडगा काढला. नवनवीन शोध लावले. त्यातून त्याचा आत्मविश्वास बळवला गेला. चांगल्या वाईट गोष्टींची जाण होत गेली. कोणता प्राणी आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि कोणता नाही? त्याला कळायला लागले. हळूहळू तो शेती करू लागला. काही वर्षांमध्येच शेतीतील पिके देखील त्याच्या नियंत्रणाखाली आली. “ट्रायल अँड एरर” पद्धतीचा वापर करून तो शिकत गेला आणि स्वतःचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळा अस्तित्व त्याने तयार केलं. हळूहळू त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होत गेले. दुष्काळ, पूर, प्राण्यांची रोग, माणसांचे रोग, असंतुलित आहार, कष्टाची काम, उपद्रवी कीटक, झाडांना होणारे रोग, युद्ध आणि गुलामगिरी यासारखी संकटे त्याने अनुभवली. त्यातूनही तो शिकला. माणसांमध्येही काही बुद्धिमान लोक राजे बनू लागले. इतर लोक हळूहळू त्यांचे गुलाम झाले. एक प्रकारची राज्यव्यवस्था तयार झाली. मालमत्ता नावाची संकल्पना उदयास साली. नोकरशाही तयार झाली. शिक्षणाची सुरुवात झाली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी नियम तयार झाले. आणि यातूनच न्यायाची संकल्पना देखील उदयास आली. अर्थात हे नियम सर्वांनाच समान पद्धतीने लागू झाले नाहीत. लाखो लोक अतिशय थोडक्यात लोकांचं अर्थात राजांचं, नेत्यांचं ऐकू लागले. हेच राजे नेते न्याय देणारे ठरले. परंतु न्यायाची संकल्पना समानतेकडे झुकली नाही. कदाचित आजही समाजव्यवस्थेतील ही परिस्थिती बदललेली नाही.
अशा विविध गोष्टींचा ऊहापोह करण्याचे काम रंगीत चित्रांद्वारे “अनस्टॉपेबल अस” च्या या खंडामधून होते. इतिहास हा नेहमी शिकवणारा असतो, बोध देणारा असतो. अर्थात इतिहासाच्या मांडणीतूनच तयार झालेला हा ग्रंथ बऱ्याच वेगवेगळ्या शिकवण्या देतो. आणि कदाचित याही पुढे आपली प्रगती न थांबविणारा सेपियन “अनस्टॉपेबल” म्हणूनच राहील, असे दिसते.

पुस्तकाचे नाव: अनस्टॉपेबल अस - खंड दुसरा 
लेखक: युवाल नोआ हरारी 
अनुवाद: प्रणव सखदेव 
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन

— तुषार भ. कुटे